पुणे : भाजपमध्ये कार्यकर्ते व नेते घडविण्याचे काम केले जाते. त्यांची क्षमता बघूनच संधी दिली जाते. हा पक्ष भविष्यात गुंतवणूक करणारा एकमेव असून, पुढची पिढी तयार करण्याचे काम केले जाते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथम वर्ष कार्यअहवालाचे प्रकाशन आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, शिंदेसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, ‘रिपाइं’चे संजय सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोविड काळातील अनुभवावरील ‘प्रथम माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच रुग्णवाहिका लाेकार्पणही करण्यात आले.पाटील म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुणेकरांच्या खूप इच्छा आहेत. त्यांची पुणेकरांशी असलेली नाळ तुटता कामा नये, त्यांच्या साथीला देवेंद्र फडणवीस आहेत. मिसाळ म्हणाल्या, कामाच्या जोरावर पुढे जाता येते, हे मोहोळ यांनी दाखवून दिले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळत आहे. दिल्लीतील हेड मास्तर खूपच कडक : मोहोळरामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी गेल्या वर्षभराचा अहवाल पुणेकरांसमोर ठेवत आहे. पुणेकरांसाठी चोवीस तास कार्यालय सुरू करत आहोत. सातत्याने जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. लोकप्रतिनिधी म्हणून मला पुणेकरांनी वीस वर्षे संधी दिली, नेत्यांचा विश्वास व पुणेकरांचा आशीर्वाद यामुळे सर्व मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर जास्त प्रेम आहे. ते पुण्यावर फार लक्ष देतात, त्यामुळे आमचे काम कमी झाले आहे. इथे हेड मास्तर थोडे मवाळ आहेत, मात्र दिल्लीतील हेड मास्तर खूपच कडक आहेत.मिसिंग लिंकमुळे नवीन इकाॅनाॅमिक काॅरिडाॅर तयार होणारपुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे पुणे, मुंबई आणि एमएमआर रिजन या भागात नवीन इकाॅनाॅमिक काॅरिडाॅर तयार होणार आहे. त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल. मिसिंग लिंक ही स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या प्रकल्पाचे काम ९४ टक्के काम पूर्ण झाले असून, नाेव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या बाेगद्यामुळे खंडाळा घाटातील मार्ग टाळून सहा किलाेमीटरचे अंतर आणि अर्धा तासाचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.