भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
By नम्रता फडणीस | Updated: February 9, 2024 18:41 IST2024-02-09T18:41:10+5:302024-02-09T18:41:38+5:30
लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार

भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
पुणे : भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण नागरिक म्हणून लोकशाही टिकली पाहिजे. मंत्रालयात शेतक-यांना प्रवेश नाही. पण गुंडांना थेट परवानगी आहे. हे गुंडांचे सरकार आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजप वर हल्लाबोल केला. राष्ट्र सेवा दल येथे लोकशाही टिकविण्यासाठी ' निर्भय बनो ' या उपक्रमांतर्गत आयोजित सभेला रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आमचाही विरोध केला होता. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना विरोध करणे चुकीचे असल्याचेही पवार म्हणाले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुंडांची झाडाझडती घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पण परेड घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंडांनी रिल्स केले. या गुंडांना सरकार पोसत आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार. भाजपचे कार्यकर्ते वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात त्यांना कार्यक्रम काय आहे हे माहिती नसते. या सर्व घटनांना गृहमंत्री जबाबदार आहेत. मी निखिल वागळे यांना ऐकण्यासाठी आलो आहे असे पवार यांनी सांगितले.