भाजपचे नगरसेवक व्यंकाेजी खाेपडे यांनी केला १५ लाख सरकारी निधीचा गैरव्यवहार; वसंत मोरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:57 IST2026-02-26T15:57:17+5:302026-02-26T15:57:50+5:30
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या गुजरवाडी-निंबाळकरवाडी या गावाचे सरपंच असताना खाेपडे यांनी ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीत गैरव्यवहार केला आहे

भाजपचे नगरसेवक व्यंकाेजी खाेपडे यांनी केला १५ लाख सरकारी निधीचा गैरव्यवहार; वसंत मोरेंचा आरोप
पुणे: पुणे महापालिकेत नव्याने निवडून आलेले भाजपचे नगरसेवक व्यंकाेजी खाेपडे यांच्यावर उद्धवसेनेचे वसंत माेरे यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका आयुक्त यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या गुजरवाडी-निंबाळकरवाडी या गावाचे सरपंच असताना खाेपडे यांनी ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीत गैरव्यवहार केला आहे, असा आरोप उद्धवसेनेचे वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
या ग्रामपंचायतीच्या २०१७ ते २०२१ या कालावधीत खाेपडे यांनी दस्तनाेंदणीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मिळणारा मुद्रांक शुल्काचा परतावा, जिल्हा परिषदेकडून मिळणारा विकास निधी, ग्रामपंचायतीला मिळालेले कराचे उत्पन्न, गावाच्या हद्दीतील व्यावसायिक शेडकडून वसूल केला जाणारा कर असे सुमारे ३ काेटी ४९ लाख रुपये उत्पन्न जमा झाले हाेते. या ग्रामपंचायतीचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे. त्यावरून माेठ्या प्रमाणावर चेकद्वारे रकमा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याचे कुटुंबीय, कर्मचारी, उक्ते काम करणारी एक व्यक्ती, तिच्याकडील कर्मचारी यांच्या नावाने चेक दिले गेले. यात खाेपडे यांनी गैरव्यवहार केला. खाेपडे हे संचालक असलेल्या ज्ञानदा अर्थमुव्हर्स या संस्थेलाही धनादेश दिले आहेत. हे गाव महापालिकेत समाविष्ट हाेण्यापूर्वी दाेन दिवसांआधीच १५ लाख रुपयांहून अधिक रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यातून वर्ग केली गेली आहे, असा दावा माेरे यांनी केला आहे.