बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 03:12 PM2023-06-25T15:12:47+5:302023-06-25T15:14:22+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने वातावरणनिर्मिती केली असली तरी उमेदवारीबाबत तळ्यातमळ्यात स्थिती

BJP braces to capture Baramati The lotus will bloom or the clock will tell the time | बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

googlenewsNext

दुर्गेश मोरे/ प्रशांत ननावरे

पुणे/बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाली आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामतीत कमळ फुलवण्याचे निश्चित केले असून तशी व्यूहरचना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आखली आहे. त्यानुसार या मतदारसंघात भाजपच्या विविध मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. २०१९ मध्ये थेट राहुल गांधी यांचाच पराभव करून अमेठी ताब्यात घेतली होती. त्याच आत्मविश्वासावर बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली आहे.

मक्तेदारी मोडायचीय

शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सन २००९ पासून त्या निवडून येतात. त्यांच्या आधी दस्तुरखुद्द शरद पवार निवडून येत होते. इथला मतदार सातत्याने पवार यांच्याबरोबर राहिला असल्याचे दिसते. ही मक्तेदारी मोडीत काढायची, असा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष निवडणुकीला बराच अवधी असला तरीही आतापासूनच नगारे वाजवण्यास सुरुवात केली जात आहे. संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोबल उंचावणे, त्यांना पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देणे आदी जबाबदारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली होती. आता राज्यस्तरीय नेत्यांचे मतदारसंघात डेरेदाखल होऊ लागले आहे. शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर होते. तर नाराज गटाला भाजपमध्ये एन्ट्रीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धक्कातंत्र सुरू केले आहे.

राजकीय स्थिती

-दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतात.

-यातील दौंड (आमदार राहुल कुल) व खडकवासला (भीमराव तापकीर) विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात

-पुरंदर (आमदार संजय जगताप) व भोर (आमदार संग्राम थोपटे) विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे

-काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असला तरी स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसचे दोन्ही आमदार पवारविरोधी

-इंदापूर (आमदार दत्ता भरणे), बारामती (आमदार अजित पवार) विधानसभा राष्ट्रवादीकडे.

भाजपला कांचन कुल यांचाच चेहरा

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने वातावरणनिर्मिती केली असली तरी उमेदवारीबाबत तळ्यातमळ्यात स्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आयात उमेदवाराला लोक नाकारतील, असे भाजपच्या सर्व्हेतून समोर आले आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांना संधी दिली तर मताधिक्क्याचे समीकरण जुळत नाही. कारण सध्या पाटील यांच्याकडे असणाऱ्या सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. तर कर्मयोगी, नीरा भीमा कारखान्याकडून शेतकऱ्यांना थकीत बिले अदा न केल्याने तालुक्यात सध्या नाराजीचा सूर आहे.

दौंडचे आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि त्यांच्या गुडबुकमधील आमदार आहेत. शिवाय त्यांना जिल्हा नियोजन तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडेच संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती. खासदार सुळे या दीड लाख मतांनी विजयी झाल्या होत्या; पण २०२३ ची स्थिती पाहिली तर परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. त्यामुळे कांचन कुल यांचेच सध्या तरी पारडे जड दिसत आहे.

दाैंड, खडकवासला, भाेर आणि पुरंदरवर भाजपचे लक्ष्य

भाजपची सगळी मदार विरोधात असलेल्या चार विधानसभा मतदारसंघांवर आहे. त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील यांनी थेट भाजपत प्रवेश केला आहे. सन २०१९ मध्ये ते काँग्रेसमध्ये होते व काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होती. त्यावेळी सुळे यांना इंदापूरमधून सव्वालाख मते मिळाली होती. भोर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनविण्यात येणार होते. मात्र, ते झाले नाही. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो शरद पवार यांच्यामुळे प्रत्यक्षात आला नाही, असा थोपटे समर्थकांचा आरोप आहे. त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत. सध्या पवार कुटुंबीयांशी त्याची जवळीकता असली तरी राष्ट्रवादीला या ठिकाणी भगदाड पडले आहे. अशोकराव टेकवडेसांरख्या अनेक ज्येष्ठ आणि मातब्बरांनी अंतर्गत वादामुळे घड्याळाऐवजी हातात कमळ घेतले आहे.

खडकवासला विधानसभा तर भाजपच्याच ताब्यात आहे. सलग तिसऱ्या वेळी तिथे भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. याच मतदारसंघात सुळे यांना सन २०१९मध्ये कमी मतदान झाले होते. दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सन २०१९च्या भाजपच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार होत्या. याही मतदारसंघात सुळे यांना सन २०१९मध्ये कमी मतदान झाले होते. विशेष म्हणजे, आमदार कुल यांनी बंद पडलेला भीमा पाटस कारखाना सुरू केला. शिवाय बाजार समितीमध्येही भाजपचा झेंडा फडकावला आहे.

बारामतीत मतदानाच्या टक्केवारी घटीची शक्यता

बारामती राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला आहे. येथील शेतकरी, सर्वसामान्यांशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे यांनी गेल्यावेळी एक लाख २७ हजार ९१८ चे मताधिक्य येथे घेतले होते. म्हणजे खडकवासलाचे लीड येथे तोडण्यात त्या यशस्वी होत होत्या. मात्र, यावेळी भोरमध्येही खासदार सुळेंबद्दल नाराजी आहे. शिवाय भाजपने नीरा नदी प्रदूषणावर लक्ष घालत शेतकऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिरायती भागातील पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपने शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर राष्ट्रवादीविरोधात निशाणा साधला आहे. एकूणच बारामती जरी हक्काचा मानला जात असला तरी यावेळी स्थानिक आणि इतर मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेतली तर बारामतीत राष्ट्रवादीच्या मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: BJP braces to capture Baramati The lotus will bloom or the clock will tell the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.