नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा
By राजू इनामदार | Updated: April 21, 2025 16:03 IST2025-04-21T16:01:55+5:302025-04-21T16:03:20+5:30
देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरण बाहेर आणून गांधी परिवाराची बदनामी केली

नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा
पुणे: भारतीय जनता प्रणित केंद्र सरकारला काहीही करून नेहरू - गांधी परिवाराची बदनामी करायची आहे, त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’चे प्रकरण त्याचाच एक भाग आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा यांनी केली. देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसभवनमध्ये गौडा यांनी सोमवारी (दि.२१) पत्रकारांबरोबर या विषयावर संवाद साधला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश पदाधिकारी ॲड. भाऊसाहेब आजबे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गौडा म्हणाले, “नॅशनल हेरॉल्ड हे असे प्रकरण आहे की ज्यात पैशांची कसलीही देवाणघेवाण झालेली नाही. जे काही आहे ते सगळे कागदोपत्री व कायदेशीर आहे. कुठेही कायद्याचा भंग केलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार सक्त वसुली संचलनालय सारख्या सरकारी यंत्रणेचा वापर करून नेहरू-गांधी परिवाराची बदनामी करण्यासाठीच हे करत आहे.”
नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडित नेहरू यांनी सुरू केले. त्यात त्यांची गुंतवणूक होती. स्वातंत्र्य चळवळीत हे वृत्तपत्र देशातील जनतेचा आवाज झाले होते. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. पुढे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची स्थापना झाली. त्यात काँग्रेस पक्षाचा सहभाग आला. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्र चालेनासे झाले. त्यामुळे त्याला आर्थिक स्थिरता येण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन देण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी मदत केली. हा देखील संपूर्ण व्यवहार कायदेशीरच आहे. हे सर्व कायद्यानेच सिद्ध होईल, मात्र तरीही ‘इडी’चे अधिकारी सरकारच्या दबावातून गांधी परिवाराच्या विरोधात कारवाई करत आहेत असे गौडा म्हणाले.
देशासमोर सध्या अनेक समस्या आहेत. मणीपूर जळत होते, बेरोजगारी वाढली आहे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नितीमुळे भारतासमोरही धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे अशी टीका गौडा यांनी केली. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे, याचेही भान सरकारला राहिलेले नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाजपचे पुर्वज कधीही नव्हते. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व खुणा पुसायच्या आहेत, असा आरोप गौडा यांनी केला.
नॉन्सेन्स लोक
भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबई हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता, असा आरोप केला आहे. याबाबत विचारले असता गौडा यांनी त्यांची खिल्ली उडवली. भांडारी तसेच सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारे त्यांचे खासदार हे भाजपमधील नॉन्सेन्स लोक आहेत, त्यांची वक्तव्येही तशीच आहेत असे ते म्हणाले. मुंबई हल्ल्याचा खटला लढवणारे उज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांच्याकडून भंडारी यांनी माहिती घ्यावी, असे यावेळी गोपाळ तिवारी यांनी सुचवले.