‘जन्म-मृत्यू’ दाखले मिळणार आता २४ तासांत! महापालिकेकडून पाच ठिकाणी विकेद्रींकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:05 PM2020-11-04T14:05:07+5:302020-11-04T14:09:38+5:30

नागरिकांना एका दिवसात ‘जन्म-मृत्यू’ दाखले मिळण्याचा मार्ग सुकर

Birth and death certificates will be available in 24 hours! Decentralization in five places by the Municipal Corporation | ‘जन्म-मृत्यू’ दाखले मिळणार आता २४ तासांत! महापालिकेकडून पाच ठिकाणी विकेद्रींकरण 

‘जन्म-मृत्यू’ दाखले मिळणार आता २४ तासांत! महापालिकेकडून पाच ठिकाणी विकेद्रींकरण 

googlenewsNext
ठळक मुद्देजन्म-मृत्यूच्या दाखल्यांसह, दुरूस्ती इतर संलग्न कामे परिमंडळ कार्यालयामार्फतच होणार संगणकप्रणालीमध्ये जन्म-मृत्यू घटनांची नोंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू

निलेश राऊत- 
पुणे : जन्म-मृत्यू दाखल्यांची संगणकप्रणालीत नोंदच झाली नाही, मुख्य कार्यालयाकडून अद्याप माहितीच आली नाही़ आदी कारणांना आता आळा बसून, नागरिकांना एका दिवसात ‘जन्म-मृत्यू’ दाखले मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पुणे महापालिकेने नागरिकांचा दाखले मिळविताना होणारा त्रास कमी करण्यासाठी, ‘जन्म-मृत्यृ’ कार्यालयाचे विकेंद्रीकरण केले असून याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू केली आहे.
  

 क्षेत्रिय कार्यालयांसह महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात महिनोंमहिने खेटे मारूनही नागरिकांना दाखले मिळत नसल्याने, गेल्या कित्येक महिन्यांपासून जन्म-मृत्यू दाखल्यांची प्रक्रिया सर्वच स्तरातून मोठी टिकेची धनी ठरली़ त्यातच महापालिकेची ‘नागरी सुविधा केंद्र’ म्हणजे असुविधांचीच केंद्रे बनले असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना वेळेत जन्म-मृत्यू चे दाखले मिळण्यासाठी व एकाच कार्यालयावरील भार कमी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने, शहरातील पाच क्षेत्रिय परिमंडळनिहाय नागरी नोंदणी पध्दतीने (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम) या संगणकप्रणालीमध्ये जन्म-मृत्यू घटनांची नोंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसह, छोट्या-मोठ्या दुरूस्ती करण्यासह इतर संलग्न कामे परिमंडळ कार्यालयामार्फतच होणार आहेत.
  

 विकेंद्रीकरणाच्या या निर्णयामुळे, जन्म अथवा मृत्यू झालेल्या रूग्णालयांनी आपल्याकडील संबंधित माहिती क्षेत्रिय कार्यालयांकडे त्याच दिवशी पाठविल्यास, चोवीस तासात त्याची संगणकप्रणालीमध्ये नोंद होऊन त्याचा दाखला लागलीच क्षेत्रिय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राकडे पाठविता येणार आहे.
    ----------------
    प्रचलित पध्दतीला दिली बगल
    रूग्णालयाकडून जन्म-मृत्यूची माहिती क्षेत्रिय कार्यालयाकडे, नंतर तेथून ती कसबा पेठ येथील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे आत्तापर्यंत जात होती. तेथे ही माहिती (मूळ कागदपत्रांसह) जाण्यासच महिना दीड महिना लागत होता. त्यानंतर या कार्यालयाकडून माहितीचे संगणकीकरण करून दाखला तयार करणे व नंतर तो क्षेत्रिय कार्यालयांकडे,  तेथून नागरी सुविधा केंद्रात जात असत. मात्र आता या प्रचलित पध्दतीला बगल दिली जाणार असून, प्रत्येक परिमंडळामध्ये जन्म-मृत्यू कार्यालयाने तीन जणांची क्षेत्रिय कार्यालयनिहाय नियुक्ती केली आहे. त्यामुळे याच ठिकाणी कागपत्रांची ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिममध्ये’ कॅमप्युटरव्दारे इंट्री करणे व तेथून थेट नागरी सुविधा केंद्रात दाखले वितरणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
--------------------------
प्रलंबित दाखल्यांचे कामही लागले मार्गी 
महापालिकेच्या कसबा पेठ येथील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे कोरोना काळात अपुºया मनुष्यबळाअभावी सुमारे 7 हजार जन्माचे दाखले तर 5 हजार मृत्यूचे दाखले संगणीकरण करण्याचे काम बाकी आहे. विकेद्रीकरणाच्या या निर्णयामुळे परिमंडळनिहाय कामे वाटून देऊन, सद्य जन्म-मृत्यूच्या घटनांसह प्रलंबित दाखल्यांचे काम पूर्णत्व:स नेण्यात येणार आहे. 
    पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या भरतीच्या भिजत घोंगड्याला छेद देत आरोग्य विभागाने जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या कामाकरिता स्वतंत्र १५ जणांची नियुक्ती केली आहे. 
------------------------
जन्म-मृत्यू कार्यालयाच्या विकेंद्रीकरणाचे काम सध्या सुरू असून, येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे रूग्णालयांकडून जन्म-मृत्यूची माहिती परिमंडळ कार्यालयाकडे प्राप्त झाल्यावर एका दिवसात संगणीकृत दाखला तयार करून तो नागरी सुविधा केंद्राकडे पाठविण्यात येईल. याठिकाणी दाखल्याचे विहित शुल्क भरून नागरिकांना लागलीच दाखले प्राप्त होतील. 
डॉ़आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका. 
------------------

Web Title: Birth and death certificates will be available in 24 hours! Decentralization in five places by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.