बारामतीत रिल्स बनवण्यासाठी दुचाकीस्वाराचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट; पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:02 IST2025-08-01T21:00:33+5:302025-08-01T21:02:24+5:30

या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले

Biker performs life threatening stunt on footpath to make reels in Baramati Police teach him a good lesson | बारामतीत रिल्स बनवण्यासाठी दुचाकीस्वाराचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट; पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला

बारामतीत रिल्स बनवण्यासाठी दुचाकीस्वाराचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट; पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला

बारामती : सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईचे स्वागत होत आहे.
     
दि.२५ जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून धावत नेत रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे जणू काही जीव धोक्यात घालून रील शूट करताना दिसत होता. व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने  (एम.एच ४२ बी.पी. ००९०) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली. वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली होती. 

विशेष म्हणजे, या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले असून तोही वसूल करण्यात आला आहे. त्याबरोबर या चालकावर खटला तयार करून कोर्टात पाठविण्यात आला. अशा प्रकारे फूटपाथचा वापर चुकीच्या पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक पोलीस जवान प्रदीप काळे अजिंक्य कदम प्रज्योत चव्हाण यांनी केली आहे. 

आम्ही कडक मोहीम हाती घेत आहोत
 
शहरात वाहनांची वाढती संख्या पाहता कुणाच्याही जीवितास धोका होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. फुटपाथ  पादचाऱ्यांना सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी आहे तो हक्क स्टंटसाठी नाही. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या रीलबाजांविरोधात आम्ही कडक मोहीम हाती घेत आहोत. -चंद्रशेखर यादव.

Web Title: Biker performs life threatening stunt on footpath to make reels in Baramati Police teach him a good lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.