पुणे: भारत-पाकिस्तान या दोन देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणेविमानतळावरील काही उड्डाणे रद्द करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता दोन्ही देशातील परिस्थिती निवळल्याने विस्कळीत हवाई वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १३) रोजी दिवसभरात तब्बल १९२ विमानांची यशस्वी उड्डाणे झाली आहेत. यात ९६ विमानांचे आगमन आणि ९६ विमानांचे प्रस्थान झाले. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेले विमान रद्द होण्याचे संकट टळले असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत झाल्यामुळे आता प्रवासी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येथून प्रवास करू शकणार आहेत. विमानतळ प्रशासनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्व उड्डाणे सुरू
आठवड्यापूर्वी भारत-पाकिस्तान या दोन देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील उत्तरेकडील महत्वाचे विमानतळ सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून चंदीगड, जयपूर व इतर शहरातील विमानसेवा रद्द करण्यात येत होते. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होते. परंतु आता सुवा सुरळीत झाल्याने सर्व उड्डाणे सुरळीतपणे सुरू आहेत.
पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना होणारा त्रास आता कमी झाला आहे. सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. - संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ