मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
By संतोष कनमुसे | Updated: November 6, 2025 14:20 IST2025-11-06T14:19:10+5:302025-11-06T14:20:19+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आता प्रशासन अॅक्शनमोडवर आले असून तहसीलदार सूर्यकांत येवले याचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. पुणे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थेतील बडे अधिकारी दोषी आढळल्याचे समोर आले आहे. आणखी काही अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे का याची चौकशी सुरू आहे. आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकतो. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी सक्रिय होते अशी माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश
"या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे. याप्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे. जे सांगायचे ते सांगणार आहे. माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही. जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर आहेत त्यामुळे त्याची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तक्रार आल्यावर कारवाई सुरू करणार - चंद्रशेखर बावनकुळे
या प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "आतापर्यंत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, दमानियांचा फोन मला होता . मंगळवारी ते तक्रार फाईल करणार आहेत. उद्योग विभाग तपासेल कोणत्या योजनेतंदर्भात काय दिलंय.आम्ही आयटी पार्कचे धोरण आले तेव्हा कॅबिनेटने काही सवलती जाहीर केल्या होत्या. त्यातील त्या आहेत का? हे तपासावे लागेल, असंही बावनकुळे म्हणाले. मी यासंदर्भात तक्रार आणल्यानंतर आम्ही तपास करु. अधिकाऱ्यांनी काही गडबड केली असेल तर आम्ही तपास करु, असंही बावनकुळे म्हणाले.