RTE प्रवेशासाठी पालकांना मोठा धक्का..! शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेण्याचा मेस्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:58 IST2025-02-04T13:57:33+5:302025-02-04T13:58:53+5:30
यंदाच्या RTE प्रवेशासाठी संपूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेण्यात येणार

RTE प्रवेशासाठी पालकांना मोठा धक्का..! शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेण्याचा मेस्टाचा निर्णय
पुणे :शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत मोफत शिक्षण मिळवणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठी चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) ने निर्णय घेतला आहे की, यंदाच्या RTE प्रवेशासाठी संपूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेण्यात येणार आहे.
शाळांचे सरकारवर २४०० कोटी रुपये थकीत
मागील अनेक वर्षांपासून खासगी शाळांमध्ये RTEअंतर्गत २५% जागा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. मात्र, शाळांना सरकारकडून मिळणारी शुल्क प्रतिपूर्ती तब्बल २४०० कोटी रुपयांपर्यंत थकीत आहे. त्यामुळेच मेस्टाने हा निर्णय घेतला आहे.
पालकांमध्ये संताप..!
RTE अंतर्गत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक संभ्रमात पडले आहेत. “शुल्क विद्यार्थ्यांकडूनच वसूल केल्यास RTE च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस सुनील माने यांनी म्हटले आहे.
पालक आणि विद्यार्थी भरडले जाणार?
RTE प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संपूर्ण शुल्क भरण्याची वेळ आली आहे. यामुळे गरीब आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. सरकार आणि शाळाचालकांच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहेत, हा मुद्दा लवकरच अधिक गडद होण्याची शक्यता आहे .
राज्यभरातील RTE स्थिती
RTE अंतर्गत जागा: १,०९,१११
प्राप्त अर्ज: ३,०१,९९७
प्रतिपूर्ती थकबाकी: ₹२४०० कोटी
पुणे विभागातील RTE जागा: १८,५०७
पुणे विभागातील थकीत रक्कम: ₹१५० कोटी