पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून, काही पत्रकार आणि पोलिसांनाही दगड लागले आहेत. स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
रविवारी (दि. १५) सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सपकाळ यांच्या विधानाविरोधात सुमारे दीड तास आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली. यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. दोन्ही पक्षांच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात कुठल्याही आंदोलनाला परवानगी देणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
अमितेश कुमार म्हणाले, दोन्ही पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या आंदोलनात जर अशा घटना घडत असतील. तर ते पुन्हा होऊ नये याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. यानंतर राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय, कुठेही कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी देणार नाही. जी घटना काल घडलेली आहे. त्यामध्ये जे कोणी दोषी आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि पुढे असं होता कामा नये यासाठी पुणे शहर पोलीस पूर्ण खबरदारी घेणार आहे. पुढील तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे. ते निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कालच्या घटनेतील प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्यात आली होती का? असं काही दिसून येत नाही. पण दगड फेकण्यात आलेली आहे. ही खरी गोष्टी आहे. यानंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येईल.
दरम्यान दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेसकडून फरासखाना पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी भाजपकडून देखील दगडफेकीचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
Web Summary : Pune witnessed BJP-Congress clashes after controversial remarks. Stone-pelting injured activists, journalists, and police. Commissioner bans protest permits to prevent recurrence, promising strict action against culprits and increased vigilance.
Web Summary : विवादित टिप्पणी के बाद पुणे में भाजपा-कांग्रेस कार्यकर्ताओं में झड़प हुई। पत्थरबाजी में कार्यकर्ता, पत्रकार और पुलिस घायल। आयुक्त ने विरोध प्रदर्शनों पर रोक लगाई, दोषियों पर सख्त कार्रवाई का वादा किया।