राम नदी स्वच्छतेसाठी ‘एसटीपी’ उभारणार; भूगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 10:11 IST2025-02-15T10:11:19+5:302025-02-15T10:11:42+5:30
१९ किमीची नदी प्रदूषणरहित करण्यासाठी प्रयत्न

राम नदी स्वच्छतेसाठी ‘एसटीपी’ उभारणार; भूगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
पुणे : भूगाव ग्रामपंचायत आपल्या कार्यक्षेत्रातील राम नदी संरक्षणासाठी आता सरसावली असून, त्यांनी ‘एसटीपी’ सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पुणे महापालिकेने देखील मान्यता दिली आहे; पण हा ‘एसटीपी’ तयार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून ‘सीएसआर’साठी प्रयत्न करण्यात येत आहे. जर हा एसटीपी झाला तर राम नदी स्वच्छ व सुंदर राहणार आहे.
भुकूमपासून बावधनमार्गे सुतारवाडी पाषाणला वाहणारी राम नदी सध्या पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. अतिक्रमणामुळे या नदीचा भूगावला ओढा आणि बावधनला तर अक्षरशः नाला बनला आहे. राम नदीची मूळ रुंदी सुमारे शंभर फूट होती; परंतु अतिक्रमणामुळे ती आता वीस फुटांवर आली आहे. तिचे अस्तित्वच धोक्यात आले असून, या ठिकाणी इमारती बांधताना राम नदीच्या पात्रापासून १५ मीटर अंतरावरील सेटबॅक लाइनमध्ये बांधकाम केले जात आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास बांधकामे केली जात आहेत.
दरम्यान, सध्या विविध प्रकारचा कचरा पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे तसेच इमारतीतील सांडपाणी सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. भूगाव येथील सांडपाणी देखील प्रक्रिया न करता थेट राम नदीत जात आहे. परिणामी नदी प्रदूषित झाली आहे. यावर सातत्याने सामाजिक कार्यकर्ते कृणाल घारे यांनी आवाज उठविला. न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर अखेर स्वत: भूगाव ग्रामपंचायतीनेच नदीकाठी ‘एसटीपी’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील सजग नागरिकांनी अनेक उपाय करून कमीत कमी सांडपाणी नदीत जाईल, यासाठी देखील प्रयत्न केले आहेत.
याविषयी कृणाल घारे म्हणाले, राम नदी स्वच्छ होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. माझ्या प्रयत्नाला भूगाव ग्रामपंचायतीने देखील पाठिंबा दिला असून, त्यांनी आता ‘एसटीपी’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १९ किलोमीटरची नदी स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल.’’
पुणे महापालिकेने भूगावच्या सांडपाण्यासाठी बावधन येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राशी (एसटीपी) जोडणी करण्यास मान्यता दिली आहे; मात्र या जोडणीसाठी भूगाव ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादांमुळे निधी उपलब्ध करणे अशक्य आहे. त्यामुळे सीएसआरमधून निधी मिळणे गरजेचे आहे.
-कृणाल घारे, सामाजिक कार्यकर्ते
राम नदी दृष्टिक्षेपात
उगम : खाटपेवाडी
नदीची लांबी १९ किलोमीटर
एसटीपीचा खर्च : ४५ लाख रुपये.