नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:46 IST2025-12-18T15:45:32+5:302025-12-18T15:46:15+5:30
मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना केलेला विरोध त्यांना भोवला असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे

नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या युती संदर्भात दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची आज होणार आहे. त्यावर जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने पक्षाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे तर भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना निमंत्रित केले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटीलांवरकेलेली सततची टीका त्यांना भोवली असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी मध्यंतरी पुण्याची गुन्हेगारी कमी करण्याचा विडाच उचलला होता. निलेश घायवळ प्रकरणावरून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी महायुतीतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही माझ्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता महायुतीतीलच नेत्यांना विरोध करणे त्यांना चांगलेच भोवले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या २३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर भाजप, रिपाइं आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी होणार की नाही यावर खल सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये मनेसचा समावेश होणार की मनसे स्वतंत्र लढणार या बाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीसाठी आपने २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारी यादी जाहीर करण्यात आपने आघाडी घेतली आहे. भाजपने २ हजार ५०० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवारी यादीतील नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या युती संदर्भात दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे.