भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:45 IST2025-07-09T09:45:27+5:302025-07-09T09:45:36+5:30

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे

Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

पुणे : महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत असल्यास २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्यपातळीवरील विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. ९) २४ तासांचा संप जाहीर केला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संप टाळण्याचे आवाहन केले. या संपकाळात महावितरणकडून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय व क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

संपकाळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असून, संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून इतर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुधवारच्या (दि. ९) रजा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. वीजपुरवठ्याबाबत तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.

Web Title: Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.