बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:18 IST2025-11-18T17:18:37+5:302025-11-18T17:18:47+5:30
अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात असताना कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे

बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
बारामती: बारामती नगरपरीषद निवडणुकीसाठी सोमवारी(दि १७) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, याच दिवसाच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने केलेली पुजा चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग सोसायटीजवळच हा खळबळजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे. नारळ, लिंबु, वेगवेगळ्या डाळी, काळ्या रंगाची काढलेली चांदणी, हळद कुंकु, गारगोटीचे दगड वापर करुन पूजा केली आहे. निवडणुकीच्या काळात अज्ञात व्यक्तीने केलेल्या पुजेचा हेतू अद्याप समोर आलेला नाही.
याबाबत बारामती येथील अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली आहे. पाटील छत्रपती कारखान्याचे संचालक अजित पाटील, अभिनेते रामभाऊ जगताप यांच्यासह सोमवारी सकाळीच सहयोग सोसायटीपासून माॅर्निंग वाॅकसाठी निघाले होते. यावेळी वाटेवर काही अंतरावर मुख्य रस्त्यावरच कुणीतरी पूजा करून भानामतीचा उतारा ठेवलेला होता. येणारे जाणारे घाबरूनच जरा दुरून चालत होते. स्वच्छता करणारी महिला मनातील अंधश्रद्धेमुळे ते स्वच्छ करायला धजावत नव्हती. शेवटी पाटील यांनी उतारा ठेवलेल्या ठिकाणी थांबून ती जागा साफ करायला लावली. ज्याने कोणी मनात काही मनसुबे ठेवून ही पूजा केली होती ती पोत्यात भरली. व कचरा डेपोकडे रवाना करायला स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितले.
इलेक्शन जवळ आले की, अशा गोष्टी घडतात कदाचित इलेक्शनसाठी उमेदवारी मिळावी म्हणून असेल किंवा व्यक्तिगत कारणासाठी. परंतु ज्या बारामतीला सिंगापूरच्या धर्तीवर सुधारले जात आहे. त्याच बारामतीत अशा खुळचट विचाराने रस्त्यावर कर्मकांड होत असतील तर आपण नेमके चाललोय कुठे, विकासाच्या घोडदौडीमध्ये बदलत्या बारामतीचे नेतृत्वही सक्षम उमेदवाराकडे असले पाहिजे. जो वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारा असेल, सुशिक्षित असेल, समंजस व सुस्वभावी असेल, ज्याच्यात विनम्रता असेल व कामांमध्ये गती असेल, विकासाच्या टप्प्यावर तो या वैभवशाली बारामती नगरीला आणखी पुढे नेणारा असेल, तसेच तो ठेकेदाराशी संधान साधून कमिशनवर काम करणारा नसेल. असा नगराध्यक्ष बारामतीला लाभायला हवा. तरच ही विकासाची गंगा अखंड वाहत राहील,.खरयं ना,असा सवाल पाटील यांनी केला आहे. विषेश म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहयोग सोसायटीतील निवासस्थान येथुन काही अंतरावर आहे.
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात आहेत. तरी देखील कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे पाटील म्हणाले.