सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’
By नितीश गोवंडे | Updated: May 8, 2023 16:46 IST2023-05-08T16:45:52+5:302023-05-08T16:46:22+5:30
तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत

सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’
पुणे : रेल्वे अथवा लोकलमध्ये मासिक पास धारकांचे नेहमी बसण्याच्या जागेवरून वाद होत असतात. अनेकदा प्रवाशांमध्ये मारामारीच्या घटना देखील घडल्या आहेत. सह प्रवाशांसह तिकीट पर्यवेक्षकांशी (टिसी) अनेकजण भांडतात. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने लोकल आणि एक्स्प्रेसच्या ‘एमएसटी’ कोचमध्ये तिकीट तपासणाऱ्यांच्या खांद्यावर बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
या कॅमेऱ्यांमुळे आता विनाकारण वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या प्रवाशांचे सहज चित्रण होणार असून, त्याद्वारे अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लोकल अथवा एक्स्प्रेसमध्ये वाद घालणे महागात पडू शकते.
सध्या मुंबईतील तिकीट पर्यवेक्षकांना ५० कॅमेरे दिले असून, त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तिकीट पर्यवेक्षकांना देखील ‘बॉडी कॅमेरे’ दिले जाणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कॅमेरे शर्टच्या कॉलरजवळ (खांद्यावर) लावले जाणार आहेत. पुणे ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जूने पासधारक आणि नवीन पासधारक यांच्यामध्ये जागेवरून मारामारीच्या घटना घडल्या होत्या. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये नुकतीच अशी घटना घडली. यावेळी नेमकी कुणाची बाजू योग्य आहे, हे समजत नाही त्यामुळे अशा प्रसंगी झालेले चित्रीकरण महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते. यासह रेल्वेत अथवा रेल्वे स्थानकावर एखादी घटना घडल्यास त्याचे चित्रीकरण देखील होऊ शकते.
१२ मेगापिक्सल चे कॅमेरे...
तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत राहू शकतात. पुणे ते लोणावळा व शिवाजीनगर ते लोणावळ्या दरम्यान रोज ४१ लोकलच्या फेऱ्या होतात. यासाठी वेगवेगळ्या सत्रांत १६ तिकीट पर्यवेक्षक काम करतात. यापूर्वी आरपीएफ ला देखील अशा प्रकारचे बॉडी कॅमेरे देण्यात आले होते.