पुणे: पती सतत चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने त्याला बेदम मारहाण केली. त्यात पतीचा मृत्यू झाला. ही घटना १० जुलै २०२४ रोजी घडली होती. या प्रकरणी डॉक्टरांचा अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्टनुसार पत्नीविरोधात बुधवारी (दि. २) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आंबेगाव खुर्द येथील साहिल हाइट्समध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आरोपी महिलेला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक परशुराम अजेंटराव (२३, रा. चिंधेनगर, जांभूळवाडी) असे खून केलेल्याचे नाव आहे. तर दृषाली अभिषेक अजेंटराव (२०) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमळकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि दृषाली हे लग्नानंतर आंबेगाव खुर्द येथील साहिल हाइट्समध्ये राहत होते. दरम्यान, काही दिवसांपासून अभिषेक हा दृषालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. सतत होणाऱ्या मारहाणीला आणि जाचाला कंटाळून दृषालीने १० जुलै २०२४ रोजी पतीच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण केली. याशिवाय शरीरावर अनेक ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात अभिषेकचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत अभिषेकच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दृषालीविरोधात तक्रार दिली होती. तपासादरम्यान दृषालीने पती अभिषेकला बेदम मारहाण करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दोडमिसे करत आहेत.