सावधान! गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ, ५ लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 13:00 IST2021-10-27T12:41:54+5:302021-10-27T13:00:42+5:30
गुळ खरेदी करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

सावधान! गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ, ५ लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त
पुणे : दिवाळीच्या सणानिमित्तने घराघरात चविष्ट अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या गुळामध्ये चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुळ खरेदी करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’असे म्हणत दिवाळीचे आगमन होत असताना पुरळपोळीच्या स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा-या गुळात भेसळ होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले. त्यातही काही गु-हाळ चालक विना परवाना गुळ तयार करत असल्याचे दिसून आले.पुणे जिल्ह्यात सहायक आयुक्त संजय नारगुडे व एफडीएचे राज्याचे विधी अधिकारी संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 5 लाख 27 हजार रुपये किमतीचा 15 हजार 487 किलो भेसळयुक्त गुळ जप्त करण्यात आला.
गुळाला काळपट व पिवळसर रंग येण्यासाठी दौंड व केडगाव परिसरातील काही गु-हाळामध्ये भेसळ केली जात असल्याचे समोर आले. काही गु-हाळामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश व बिहार येथील कर्मचारी काम करत असून त्यांच्याकडून बैलांच्या शिंगाला लावला जाणारा रंग गुळात भेसळ केला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
गुळात कशाची भेसळ ?
गुळाला काळसर व पिवळा रंग येण्यासाठी त्यात अखाद्य रंगाची भेसळ करून आकर्षक रंग दिला जातो.त्यासाठी काही ठिकाणी बैल पोळ्याला जनावरांच्या शिंगाला लावला जाणारा रंग वापरला जात आहे.
गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणाऱ्या रंगाची भेसळ #Pune#Diwalipic.twitter.com/2F8opizXVm
— Lokmat (@lokmat) October 27, 2021
कोण करते ही भेसळ ?
गु-हाळ चालकांनी गुळ तयार करण्यासाठी नेमलेल्या कर्मचा-यांकडून गुळाला काळसर किंवा पिवळा रंग येत नाही तोपर्यंत त्यात अखाद्य रंगाची भेसळ करतात.
ओळखायचे कसे ?
एफडीएकडून प्रमाणित केलेल्या रंगाचाच वापर गुळांत करता येतो. तसेच हा रंग गुळ पाण्यात टाकल्यानंतर वर येत नाही. त्यामुळे गुळात भेसळ झाली असल्याचे ओळखण्यासाठी संबंधित गुळ पाण्यात टाकून पाहिल्यास गुळात वापरण्यात आलेला रंग वर येतो. यावरून भेसळयुक्त गुळ ओळखता येतो.
''केडगाव येथील दिलदार मुर्तुजा गुल उद्योग आणि समर्थ गुळ उद्योग, तसेच पिंपळगाव येथील लक्ष्मी गुळ उद्योग, कापरे गुळ उद्योग आणि कानरखेड मधील जानवी गुळ उद्योगावर कारवाई करण्यात आली आहे असे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.''