सावधान..! फेक केवायसी फाइल डाऊनलोड करताच बँक खाते झाले रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:24 IST2024-11-17T18:22:18+5:302024-11-17T18:24:15+5:30
सावरगाव : मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील विविध सोशल मीडिया व विशेषता हॉट्सअॅप ग्रुपवर कॅनरा बँकसह इतर बॅँकेच्या फेक ...

सावधान..! फेक केवायसी फाइल डाऊनलोड करताच बँक खाते झाले रिकामे
सावरगाव : मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील विविध सोशल मीडिया व विशेषता हॉट्सअॅप ग्रुपवर कॅनरा बँकसह इतर बॅँकेच्या फेक केवायसी फाइलसंदर्भात मेसेज व्हायरल होत आहे. अनेकदा सर्व सामान्य नागरिक बँकेच्या मेसेजविषयी थोडा जागरूक असतो. आपले खाते बंद होऊ नये म्हणून ते बँकेच्या केवायसीचे फेक मेसेजला सहज बळी पडतो . सध्या अशा तीन चार घटना जुन्नर शहर व परिसरातील गावात नागरिकांच्या विषयी घडून आल्या आहेत.
एका महाविद्यालयीन तसेच दुसऱ्या शाळेच्या शिक्षकांकडून नजर चुकीने ती फाइल डाउनलोड झाली. फाइल डाउनलोड होताच त्या शिक्षकाचा प्रथमता मोबाइल हॅक झाला. त्यानंतर त्या शिक्षकाच्या मोबाइल नंबरवरून इतर विविध सामाजिक व शैक्षणिक ग्रुपवर तो मेसेज प्रचंड व्हायरल झाला व शिक्षकांनी पाठविलेल्या मेसेजवर विश्वास ठेवत अनेकांनी ती बँक केवायसीची फाइल डाउनलोड केली. तर काही क्षणात त्याच्या बँके खात्यातील काही रक्कम हॅकरद्वारे काढण्यात आली. तर काही लोकांच्या लक्षात येताच त्यानी आपला मोबाइल स्विच ऑफ केला. तसेच संबंधित व इतर बँकेशी संपर्क करून आपले खाते तात्काळ बंद करण्याची विनंती त्यांना केली.
संबंधित शिक्षक व फसवणूक झालेल्या तीन नागरिकांनी ऑनलाइन तक्रार पुणे सायबर सेल विभागाकडे केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया हाताळताना कोणतीही लिंक किंवा फाइल ओपन करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा स्वतःचे बँकखाते रिकामे करून बसण्याची वेळ येऊ शकते.
मागील तीन दिवसांत चार-पाच नागरिकांच्या बँक केवायसी फाइल डाउनलोड केल्याने मोबाइल हॅक होऊन बँक खात्यातून काही रक्कम परस्पर काढल्याच्या तकारी आलेल्या आहेत. अशा फसवणुकीच्या तक्रारी पुणे सायबर सेलमध्ये करण्यात आल्या आहेत नंतर पोलिस स्टेशनकडे तक्रारी करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सावधान व जागरूक राहावे. अन्यधा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल.
- मंगेश डोके, पोलिस पाटील, कुमशेत