बारामती: बचतगटातील महिलांची फसवणूक प्रकरणी ढमढेरे दांपत्याला सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 04:39 PM2023-07-26T16:39:20+5:302023-07-26T16:40:13+5:30

ढमढेरे दांपत्याविरोधात फसवणुकीसह एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता...

Baramati: Dhamdhere couple sentenced to rigorous imprisonment in case of cheating women in savings group | बारामती: बचतगटातील महिलांची फसवणूक प्रकरणी ढमढेरे दांपत्याला सश्रम कारावास

बारामती: बचतगटातील महिलांची फसवणूक प्रकरणी ढमढेरे दांपत्याला सश्रम कारावास

googlenewsNext

बारामती : १२ टक्के व्याजदराचे आमिष दाखवित सक्सेस ग्रुपच्या माध्यमातून बचतगटातील महिलांची फसवणूक करणाऱ्या मंदाराणी शिवाजी ढमढेरे व शिवाजी तुकाराम ढमढेरे या दांपत्याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ८ फेब्रुवारी २०१९ मध्ये बारामती तालुका पोलिस ठाण्यात ढमढेरे दांपत्याविरोधात फसवणुकीसह एमपीआयडी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिसा आस्लम शेख यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार या प्रकरणी एकूण सातजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सक्सेस ग्रुप स्थापन करत त्या अंतर्गत या सातजणांनी श्री. महालक्ष्मी नारायण महिला महासंघ, पुणे ही संस्था स्थापन केली होती. त्या अंतर्गत महिलांना वेगवेगळी आश्वासने व आमिषे दाखवण्यात आली. महिला सबलीकरणाच्या नावाखाली महिलांचे बचतगट स्थापन करण्यात आले. प्रत्येक महिला सभासदांकडून दरमहा २०० रुपये बचत रक्कम स्वीकारली जात होती. सलग १२ महिने रक्कम भरल्यास त्यावर १२ टक्के व्याज दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. महिलेने प्रतिवर्षी २४०० रुपये भरल्यास तिला २६८८ रुपये मिळणार होते. या गटाच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक महिलांचे पैसे गोळा केले गेले. परंतु त्यांची मुद्दल व व्याज परत केले नाही.

याशिवाय शिवजीत मुद्रा को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे ११०० रुपयांचे शेअर्स घेतल्यास शेअर्स होल्डर्सला ३ महिन्याने १० हजार रुपये दिले जातील, असे आमिष दाखवण्यात आले होते. ही शेअर्सची रक्कम स्वीकारून परतावा दिलेला नव्हता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकाल ठरावीक मुदतीत देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आरोपींविरोधात न्यायाधीश जे. ए. शेख यांनी विविध कलमानुसार चार्ज ठेवला होता.

सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांनी या खटल्यात २० जणांच्या साक्षी घेतल्या. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मंदाराणी शिवाजी ढमढेरे व शिवाजी तुकाराम ढमढेरे या दोघांना एमपीआयडी ॲक्टनुसार दोषी धरत ६ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. फसवणुकीच्या कलमान्वये सात वर्षे सश्रम कारावास व पंधरा लाख रुपये दंड व दंड न भरल्यास २१ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक बी. बी. जाधव, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस निरीक्षक युवराज मोहिते, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार संदीप घारे, पोलिस हवालदार संतोष शिंदे यांचे त्यांना सहकार्य झाले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार नामदेव नलवडे, अभिमन्यू कवडे यांनी काम पाहिले.

Web Title: Baramati: Dhamdhere couple sentenced to rigorous imprisonment in case of cheating women in savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.