Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 20:18 IST2021-05-31T20:18:13+5:302021-05-31T20:18:43+5:30
रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते...

Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना
बारामती: माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि. ३१) भर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.
रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.
जखमी अवस्थेतील तावरे यांना दादा जराड, मयुर भापकर, युवराज जेधे, आदेश डोंबाळे यांनी तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. माळेगावातील राजकीय घडामोडींमध्ये रविराज यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे आज त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत वेगळीच चर्चा रंगत आहे.
—————————————————
....फायरिंगचा आवाज आला
माळेगाव कारखाना रस्त्यावरील झेलसिंग रस्त्यावर संभाजीनगर परिसर आहे. या ठिकाणी मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी रविराज तावरे हे त्यांच्या ऑडी कार (एमएच १२ —केइ १८००) मधुन वडा पाव घेण्यासाठी आले. वडापाव घेवुन त्याचे पैसे देऊन गाडीत बसत होते. यावेळी दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ‘फायरींग’चा आवाज आला.मात्र, येथील मुलांनी गाडीचा टायर फुटला असल्याचे समजुन दुर्लक्ष केले. मात्र, तावरे यांच्या पत्नी ओरडल्याने मुलांसह ग्रामस्थांनी धाव घेतली.
.