Baramati Accident News : माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:27 IST2025-07-29T12:26:55+5:302025-07-29T12:27:09+5:30
जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात.

Baramati Accident News : माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही
पुणे - बारामती शहराला हादरवून टाकणाऱ्या एका भीषण अपघातात रविवारी सकाळी एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या धडकेत वडील आणि त्यांच्या दोन चिमुरड्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत जखमी अवस्थेतही वडिलांनी आपल्या लेकींना वाचवण्याचा केलेला प्रयत्न पाहून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, अपघातात ओंकार आचार्य (रा. मोरगाव रोड, बारामती), त्यांची १० वर्षांची मुलगी सई आणि ४ वर्षांची मधुरा, ही तिघंही दुचाकीवरून जात असताना (MH 16 CA 0212) भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी चाकाखाली आली आणि तिघंही चिरडले गेले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात. त्यांचा पोटाखालचा भाग पूर्णपणे गंभीररीत्या जखमी झाला होता. माझ्या लेकींना वाचवा हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. काही क्षणांतच त्यांनी जागीच प्राण सोडला. सई आणि मधुरा यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दरम्यान, या दुर्घटनेतील दुःख अद्याप ओसरलेलंही नव्हतं, की आचार्य कुटुंबावर आणखी मोठा आघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ओंकार आचार्य यांचे वडील, राजेंद्र श्रीनिवास आचार्य (७०) यांचंही आज सकाळी निधन झालं.
सेवानिवृत्त शिक्षक असलेले राजेंद्र आचार्य हे मधुमेहाने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आजारी असलेल्या वडिलांसाठी फळं आणण्यासाठीच ओंकार आपल्या दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर पडले होते. मात्र त्या छोट्याशा प्रवासात नियतीने संपूर्ण कुटुंब हिरावून नेलं.