Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:51 IST2024-10-14T13:50:13+5:302024-10-14T13:51:17+5:30
तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या आणि बुक न करता साहित्य वाहून नेणाऱ्यांकडून १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल
पुणे : सणांमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी वाढल्यामुळे पुणे रेल्वे विभागाकडून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर एका दिवसात फुकट्या प्रवाशांकडून एक लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सणांच्या काळात रेल्वेला गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा मिळावी म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे व वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत ३५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन आरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. चेकिंग दरम्यान, सर्व प्रवेशद्वारांवर तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान, विना तिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या ४१० प्रवाशांकडून आणि बुक न करता साहित्य वाहून नेणाऱ्यांकडून १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी वैध प्रवास तिकिटांसह प्रवास करावा. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि तिकीट क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना दंडात्मक शुल्क टाळण्यासाठी वैध प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.