हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:33 IST2023-03-19T13:33:18+5:302023-03-19T13:33:29+5:30
चित्रपटात नायकापेक्षाही खलनायकच लक्षात राहतो

हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे
पुणे: नसरुद्दीन शाह हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समकालीन असतानाही त्यांना हिरोची भूमिका कधी का मिळाली नाही? त्यावर अमिताभ बच्चन, अजय देवगण हे सिनेस्टार आहेत; पण बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' आहेत, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
निमित्त होते, लोकमत सखींसोबत दिलखुलास गप्पा या कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. १८) त्यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला अनौपचारिक भेट दिली. मिलिंद शिंदे! सिनेसृष्टीला मिळालेला एक जबरदस्त कलाकार. भूमिका कुठलीही असो, पूर्ण पडदा व्यापून टाकण्याची ताकद या कलाकारात आहे. म्हणूनच मराठीच काय, कानडी रसिक देखील त्यांच्यावर तितकंच प्रेम करतात. त्यांच्याशी लाेकमत सखींनी संवाद साधला.
तुम्ही अभिनयाकडे कसे वळलात?
सखी पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर मिलिंद शिंदे म्हणाले, अभिनेता झालो नसतो, तर कदाचित भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मोठा अधिकारी असतो. माझे आजोबा लोककलावंत होते. आजोबांचे गुण नातवात येतात असं म्हणतात. तोच आजोबांचा वारसा माझ्यात आला. माझ्या वडिलांचा अभिनेता होण्याला विरोध होता. पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांचा विरोध मावळला. मी एनएसडी आणि एफटीआयआयमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. दिल्लीत एनएसडीला अभिनयाचे धडे घेत असताना नसरुद्दीन शहा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच आज मी अभिनय क्षेत्रात एवढं काम करू शकलो. काही अभिनेते नाटकाचा पायरी म्हणून वापर करतात. त्यांना मोठ्या पडद्यावरच काम करायचे असते. पुण्या-मुंबईच्या पलीकडे राहणारी लोकदेखील अभिनय करू शकतात यावर लोकांचा विश्वासच नाही, असेही ते म्हणाले.
तुम्ही खलनायकाचीच भूमिका का साकारता?
या प्रश्नावर अभिनेते शिंदे हसले. नायकापेक्षाही खलनायक लक्षात राहतो, असे ते म्हणाले. मराठी सोडून वेगळ्या भाषेत काम करताना काय अडचणी आल्या? असे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले. रस्त्याने बायका थोडं घाबरूनच अंतर ठेवून चालतात, असे शिंदे म्हणताच हशा पिकला.
ते प्रेम नव्हे, पायरी
अनेक कलाकार म्हणतात की, नाटकं हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. जे अगदी खोटे असते. तो फक्त दिखाऊपणा असतो. खरं तर नाटक ही चित्रपटामध्ये जाण्यासाठी केवळ 'पायरी' असते, असे मत मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले.