पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 22:21 IST2021-04-28T22:20:33+5:302021-04-28T22:21:19+5:30
अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मोळे यांची ओळख होती.

पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू
येरवडा: पुणे शहर वाहतूक पोलीस दलातील विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे (वय ५८) यांचे बुधवारी दुपारी कोरोना आजारामुळे निधन झाले.सेवानिवृत्तीसाठी केवळ एक महिना शिल्लक राहिला होता.
अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मोळे यांची ओळख होती. पुणे शहर, मुंबई, सांगली, सोलापूर या ठिकाणी त्यांनी काम केले. येरवडा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुरुवातीच्या काळात ते कार्यरत होते.
येरवडा पोलीस स्टेशन आवारातील विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते सध्या कार्यरत होते. मागील आठवड्यात त्यांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मोळे यांच्या पार्थिवावर येरवडा स्मशानभूमी येथे बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांच्या अकाली निधनामुळे पोलिस दलासह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.