विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका
By नितीश गोवंडे | Updated: April 25, 2025 17:56 IST2025-04-25T17:55:28+5:302025-04-25T17:56:22+5:30
आसामच्या तरुणीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता, तिला ६ वर्षाची मुलगी आहे, नवऱ्याला दारूचे व्यसन असून तो तिला त्रास देत होता

विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका
पुणे : विवाहाच्या आमिषाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आसाममधील तरुणीची पाच लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनाेळखी पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम), पापा शेख, अधुरा शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ), तसेच एका अनोळखी डीबीवाला (पोलिस कर्मचारी) या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफीऊल मूळचा आसाममधील आहे. त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाममधून पळवून आणले. त्याने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयात तरुणीची विक्री केली. तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. आरोपींच्या ओळखीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांमुळे गुन्हा दाखल
परिसरातील दत्त मंदिराजवळ पीडितेला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले. पीडितेने तिच्यासोबत घडलेली घटना त्यांना सांगत मदत करण्याची विनंती केली. या सामाजिक कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन तिची कुंटणखान्यातून सुटका केली. कुंटणखाना चालक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून आणले पुण्यात..
पीडिता मूळची आसाम येथे राहणारी असून तिचा २०१८ मध्ये विवाह झाला आहे. तिला ६ वर्षाची मुलगी आहे. तिच्या नवऱ्याचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्याला दारूचे व्यसन असून तो पीडितेला त्रास देत होता. भाजीच्या गाड्यावर ती असताना शफीऊल तेथे आला. त्याने तुला मुलीसह पुण्याला घेऊन जातो. कामाला लावतो, तेथे तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे सांगून, विमानाने पुण्याला आणले. त्यानंतर त्याने पापा शेख याला तिला ५ लाख रुपयांना विकले. पापा शेख याने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायाला लावले. डीबीवाल्या पोलिसांनी (डिटेक्शन ब्रांच) तिला मदत करायची सोडून तिच्याबरोबर या पोलिसाने वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
‘तो’ डीबीवाला कोण..?
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत पोलिसाने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांना ‘तो’ डीबीवाला कोण याचा शोध लागलेला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी तपासात निष्पन्न होईल असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी वरिष्ठ पोलिस मुद्दाम संबंधित डीबीवाल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ‘तो’ डीबीवाला कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.