सह्याद्री रुग्णालय तोडफोडप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:29 IST2025-12-17T18:27:49+5:302025-12-17T18:29:19+5:30
संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर तीव्र मानसिक आघात झाला.

सह्याद्री रुग्णालय तोडफोडप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर
पुणे : हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयाच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना लष्कर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अजय केरू सपकाळ, कुणाल हनुमंत सपकाळ, शुभम संजय सपकाळ, गौरव गणेश सपकाळ, विश्वजित कुंडलिक सपकाळ, मंगेश दत्तात्रय सपकाळ आणि वैभव हनुमंत सपकाळ अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. अजय सपकाळच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापनाच्या कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात करीत, संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर तीव्र मानसिक आघात झाला.
या भावनिक तणावातून रुग्णालयाच्या आवारात उद्रेक झाला असल्याचे बचाव पक्षाकडून मांडण्यात आले. ही बाब ॲड. प्रियांका जाधव-काटकर आणि ॲड. श्रद्धा प्रकाश जाधव यांनी सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडली. या प्रकरणातील सर्व तथ्ये, आरोपांचे स्वरूप, घटनेची परिस्थिती, आरोपींची भूमिका तसेच जामीन देताना विचारात घेतले जाणारे कायदेशीर निकष लक्षात घेऊन न्यायालयाने आपला विवेकाधिकार वापरत सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन हा नियम असून, कारावास हा अपवाद आहे. या न्यायसिद्धान्ताचा अवलंब करत न्यायालयाने हा आदेश पारित केला. कामकाजात ॲड. कुणाल सोनवणी, ॲड. अथर्व पिंगळे तसेच चिराग गावंदे यांनीही वकिलांना मोलाचे साहाय्य केले.