‘बाकीबाब’ची अप्रकाशित ‘लावण्यरेखा’ पुस्तकरूपात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:03 PM2019-11-25T12:03:42+5:302019-11-25T12:05:17+5:30

‘आनंदयात्री कवी’ अशी ओळख असलेल्या बोरकरांच्या अनेक नाजूक, नादमय, छंदोबध्द प्रेमरचनांसह निसर्ग कवितांची पारायणे अनेकांनी केली असतील...

'Baikabab' Unpublished 'Lavyanirekha' in book format | ‘बाकीबाब’ची अप्रकाशित ‘लावण्यरेखा’ पुस्तकरूपात

‘बाकीबाब’ची अप्रकाशित ‘लावण्यरेखा’ पुस्तकरूपात

googlenewsNext
ठळक मुद्दे७० ते ७२ कविता आणि अनुवादित केलेल्या कविता यांचे ‘लावण्यरेखा’ हे पुस्तक

नम्रता फडणीस- 
पुणे :  

‘ओघळती रंग जळी; 
मावळती वेळा
तरल हवेवर झुलतो 
मंद गंध शेला’ किंवा
‘गाईन मी स्मर सुखे तव चांदण्यात दे साथ तू मज 
सुखे स्वर साधण्यात’
‘बाकीबाब’ म्हणजे बा.भ. बोरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून कागदावर उतरलेली ही अप्रतिम शब्दप्रतिभा. ‘आनंदयात्री कवी’ अशी ओळख असलेल्या बोरकरांच्या अनेक नाजूक, नादमय, छंदोबध्द प्रेमरचनांसह निसर्ग कवितांची पारायणे अनेकांनी केली असतील. मात्र, त्यांच्यावरील उल्लेख केलेल्या अनेक अप्रकाशित कवितांविषयी कायमच रसिक मनाला रुखरुख लागून राहिली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी बोरकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बोरकर यांची कन्या मुक्ता आगशीकर यांनी त्यांच्या अप्रकाशित कवितांचा अमूल्य ठेवा पुस्तकरूपात वाचकांना भेट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या ‘लावण्यरेखा’ या अप्रकाशित काव्य संग्रहाचे प्रकाशन गोव्यामध्ये केले जाणार आहे.
‘तव नयनांचे दल हलले गं, पानावरच्या दवबिंदुपरी त्रिभुवन हे डळमळले ग’ यासारख्या बोरकरांच्या असंख्य प्रेमकवितांच्या हिंदोळ्यांवर अनेकांची प्रेमं फुलली आहेत. प्रत्येक कवितेमधलाकुठला तरी एक शब्द संगीतकाराचं  बोट धरुन त्याला आपल्या कवितेच्या महालात घेऊन गेला आहे. निसर्गाच्या कुपीत दडलेले सौंदर्यदेखील बोरकरांनी आपल्या काव्यप्रतिभेतून उलगडले आहे. 
बोरकरांच्या कवितांचा एक खास कप्पा काव्य प्रेमींच्या मनात दडलेला आहे. बोरकरांच्या काव्यरचनांचे गारुड रसिकमनावर आजही कायम आहे, हेच त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.आताबोरकरांच्या अप्रकाशित काव्य प्रतिभेचा अविष्कार पुस्तकरूपात येत आहे. ही काव्यप्रेमींसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे.
..........
इतक्या वर्षांत वडिलांनी अनेक कविता लिहिल्या; पण सगळ्या प्रकाशित झालेल्या नाहीत. त्यातील काही त्यांनी स्वसंग्रही ठेवल्या होत्या. आजमितीला बा. भ. बोरकर यांच्या काव्यांचे १ आणि २ खंड प्रसिद्ध झाले आहेत; पण त्यातही या कवितांचा समावेश करण्यात आलेला नाही. १९३२ ते १९७० दरम्यान विविध दिवाळी अंक आणि मासिकांधून छापून आलेल्या अशा ७० ते ७२ कविता आणि अनुवादित केलेल्या कविता यांचे ‘लावण्यरेखा’ हे पुस्तक आमच्या ईशा प्रकाशनातर्फे गोव्यामध्ये प्रकाशित केले जाणार आहे. प्रसिद्ध समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. यावेळी अनन्वयतर्फे माधवी वैद्य ‘बाकीबाब’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. - मुक्ता आगशीकर
 

Web Title: 'Baikabab' Unpublished 'Lavyanirekha' in book format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे