बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:06 IST2025-10-29T13:04:54+5:302025-10-29T13:06:32+5:30
अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असा ते प्रयत्न करत असतात

बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले आहे. त्यांनी रास्ता रोको सोबतच रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना चर्चेला येण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना त्रास होईल असं काही करू नये असं त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
फडणवीस म्हणाले, आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलावली होती. आपण चर्चा करून ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू. असं आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्रीत मला संदेश पाठवला की, लोक जमा होतील त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही. मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता येतील अशी परिस्थिती आता नाहीये.
त्या गोष्टीवर चर्चा करून रोड मॅप तयार करावा लागेल. म्हणून कडू यांना चर्चेचे निमंत्रण देखील आम्ही दिलेले आहे. आता काल आपण बघितलं असेल. तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झाला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सची खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आवाहन आहे की, त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारे आंदोलन करू नये. लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. अशा आंदोलनांमध्ये काही हौशे, नवशे, गवशे शिरतात. त्यांचा धोका असतो की, त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता संवाद साधण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आंदोलन किंवा बाकी गोष्टी करणं योग्य नाही. त्या करून दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आवाहन आहे कि, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचा पॅकेज दिलंय. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देत आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा.
आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊदे
एक प्रमुख जी मागणी कर्जमाफीची आहे. त्यावर सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केली आहे. आज पहिला प्रश्न असा आहे की, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे खराब झालेला आहे. शेती खराब झाली आहे. पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा कर्जमाफी करतो. त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात. त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. त्या संदर्भात आम्ही योग्य काही तो निर्णय घेणार आहोत. आज पहिली आवश्यकता काय आहे? या गोष्टींवर विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत. असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.