Baba Adhav Passes Away : श्रमिकांचे सन्मानपूर्वक जीवन हा असेल विकासाचा केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:30 IST2025-12-09T13:29:46+5:302025-12-09T13:30:14+5:30
माझे गुरू कुणी एक व्यक्ती नसून, लोकशाही, समाजवाद हा विचारच माझा गुरू आहे, अशा शब्दांत बाबांनी 'लोकमत'कडे काही महिन्यांपूर्वी भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर आजवरच्या वाटचालीवर भाष्य करताना देशाने विज्ञानाची कास सोडली अन् अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली, असे निरीक्षणही नोंदवलं होतं.

Baba Adhav Passes Away : श्रमिकांचे सन्मानपूर्वक जीवन हा असेल विकासाचा केंद्रबिंदू
माझे गुरू कुणी एक व्यक्ती नसून, लोकशाही, समाजवाद हा विचारच माझा गुरू आहे, अशा शब्दांत बाबांनी 'लोकमत'कडे काही महिन्यांपूर्वी भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर आजवरच्या वाटचालीवर भाष्य करताना देशाने विज्ञानाची कास सोडली अन् अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली, असे निरीक्षणही नोंदवलं होतं.
....
दुसरे महायुद्ध झाले होते. जगाचे चित्र वेगळे होते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटिशांना भाग झाले होते. येथील विषमता आणि क्रूरता याविरुद्ध ब्रिटिशांचा उदारमतवादी विचार लोकांनाही अपील झाला होता. याचे कारण स्वातंत्र चळवळीतील निम्मे नेते बॅरिस्टर होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर येथील संस्थानिक देखील विलीन झाले. ही खूप महत्त्वाची गोष्ट घडली होती. त्याचबरोबर नेत्यांनी देखील स्वतःचे पोशाख बदलले. गांधींनी सर्वांना खादीचा मंत्र दिला. देश स्वतंत्र झाला तेव्हाची आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती. तरीही वैज्ञानिकतेची, विज्ञानाची कास धरण्याऐवजी आपण भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नात अडकून पडलो. अनेक वर्ष या संघर्षात घालवली. यातून भाषावार प्रांत तयार झाले, पण त्या त्या भाषेचे प्रश्न तसेच राहिले. भाषेलाही नाही मिळू शकला नाही, म्हणून आज प्रादेशिक भाषांची अवस्था बिकट झाली आहे. जातीचे गोडवे गाणे, धर्माचे उदातीकरण करणे या प्रकारात आपण गुरफटून पडलो. जे शहाणपण भारतीय म्हणून यायला पाहिजे होतं ते आलं नाही. महात्मा गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी समाजाला एकत्र केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून संविधान लिहून घेणे यात महात्मा गांधींचे व्हिजन दिसते. भारतीय संविधान मान्य झालं, पण त्याचा निर्धार पुढे गेला नाही. भारत-पाक फाळणीने तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आयते खाद्य मिळाले. त्याच बळावर गांधींचा खून करण्यात आला. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. समुद्रात पाय ठेवणे हे सुद्धा जिथे पाप मानले जायचे, तिथे प्रगतीची पायवाट दाखवणे सोपे नव्हते. अशा काळात आपल्याकडे व्यक्तींचे कौतुक अधिक झाले आणि वैज्ञानिक मन घडवण्यामध्ये देश कमी पडला, हे मान्य करावं लागेल.
आज इंदिरा गांधीच्या हुकूमशाही विरोधात बोलणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आणीबाणीच्या वीस कलमी योजनेत सहभागी होते, हे अनेकांना माहीतच नाही. स्वातंत्र्यानंतर देशात विज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेती क्षेत्रात प्रगती करण्याचा अजेंडा ठरवण्याऐवजी धर्म, जात आणि प्रादेशिक मुद्दा राजकीय पटलावर प्राधान्याने मानल गेला. यात देशाने खूप काही गमावले आहे. आज थोडीफार जी काही प्रगती दिसत आहे, ती विज्ञानाच्या वाटेवर थोडेफार केलेल्या कामाची पावती आहे. मागील काही वर्षात देशात आणि राज्यात विज्ञानाचा मुद्दा तर पूर्ण बाजूला पडला आणि धर्म चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. धार्मिक आणि जातीय भावना तीव्र होऊ लागल्या. परिणामी संघ मानसिकतेचे लोक आजही संविधान पूर्णपणे मान्य करायला तयार नाहीत. यातून देशाने प्रगतीच्या वाटेवरून अधोगतीची वाट धरल्याचे दिसते. भांडवलशाही स्वतःच स्वतःची कबर खोदेल, असे भाकीत कार्ल मार्क्सने केले होते, पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. भांडवलशाही आपली कबर खोदण्याऐवजी स्वतःत बदल करून नव्या रूपात आपल्यापुढे अवतरली आहे.
देशात आजही गरिबी भयानक स्वरूप धारण करताना दिसत आहे. त्यामुळे कामाचे तास वाढवले जात आहेत. लिंग गुणोत्तर प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. महिला, मुलींवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजवादाचा पुरता बँड वाजला आहे. महायुद्धात बेचिराख झालेले देश विज्ञानाची कास धरून जागतिक पटलावर वेगळे स्थान निर्माण केल्याचे दिसून येते. त्या उलट आपल्याकडची परिस्थिती आहे. यातून सावरायचं असेल तर नकला करून नाही चालणार. विज्ञानाची कस धरावी लागेल, ओरिजनल काही निर्माण करावे लागेल. प्रगत देशाचं अनुनय न करता त्यांच्याशी खुली स्पर्धा करावी लागेल. त्यासाठीची धमक दाखवावी लागेल. परावलंबित्व दूर करावे लागेल.
स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या ठळक गोष्टी पाहता पुढे सुटे सुटे प्रश्न घेऊन संघर्ष होत राहिले. आणीबाणी विरुद्धचा लढा तीव्र राहिला. पण देशभरातील एकूण सर्वच चळवळी पाहता त्यांचा अजेंडा म्हणावा तसा विज्ञानाचा आग्रह धरणारा राहिलेला नाही. देशात मंडल विरुद्ध कमंडळ असे ध्रुवीकरण झाले. यात परिवर्तनवादापेक्षा परंपरावादी पुढे आले. मागील काही वर्षांपासून तर सत्ता हस्तगत करून धार्मिक, जातीय आणि प्रादेशिक अस्मिता तीव्र करून समाजा-समाजात आग लावण्याचे काम अधिक सुरू आहे. मुख्य मुद्दे बाजूला करून, मुद्देहीन विषय चर्चेत ठेवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. यासाठी अगदी माध्यमांपासून न्यायंत्रणेपर्यंत, पोलिसांपासून निवडणूक आयोगापर्यंत सर्व घटकांचा सोयीस्कर वापर सुरू आहे.
यात डावे, आंबेडकरवादी, समाजवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन काम करणाऱ्या संस्था संघटना क्षीण झाल्या आहेत. संविधानाचा जागर होण्याऐवजी संविधान संपविण्याचा अजेंडा शिस्तबद्धपणे राबविला जात आहे. सोईस्करपणे हिंसेला बळ दिला जात आहे. सरकार पुरस्कृत हिंसाचार वाढत आहे. माध्यम निःपक्ष राहिलेले नाहीत. सत्तेला प्रश्न करण्याऐवजी विरोधकांनाच लक्ष्य केले जात आहे. सर्व नियम ढाब्यावर बसून राजरोसपणे निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या नावाखाली पैशांचे वाटप करून मत विकत घेतले जात आहे. हे सर्वश्रुत असूनही कुणीच काही करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणी आक्षेप घेतलाच तर त्याचा आवाज दाबला जातोय. जगातल्या दहा श्रीमंत लोकात भारतीय अदानी आणि अंबानी हे उद्योजक दिसतात, पण त्याचवेळी देशाचा प्रगतीचा आलेख मोठ्या प्रमाणात खाली येताना दिसतोय. हे असं का घडते आहे, याचा विचार आता केला जाऊ लागला आहे. आपल आयुष्य आपणच घडवल पाहिजे याची जाणीव वेळीच करून घेत तरुण पिढी पुढे येत आहे. यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत.
सर्व चळवळी अस्तित्वहीन झाल्या असताना विज्ञानाची कास धरून पुढे येणारी तरुणाई आशेचा किरण आहे. तरुणाई रस्त्यावर उतरू लागली आहे. यामुळे राज्यव्यवस्था खिळखिळी होईल, पण दुसरीकडे देशात अराजकता निर्माण होण्याचा धोकाही अधिक आहे. त्याचे कारण धर्म, जात त्याच्या पलीकडे जाऊन लढ्याचं बोधवाक्य 'सर्व माणसांच रक्त लाल आहे आणि रक्ताला जात नसते' हे होत नाही. त्याउलट जातीच्या आरक्षणाचा प्रश्न तीव्र होत आहे. संविधानाचा अजेंडा सोडून देव, धर्म आणि देशासाठी असे म्हणत मंदिराचा मुद्दा चर्चेत ठेवला जात आहे. सत्ताधारी वर्ग आपला हा अजेंडा जोरकसपणे राबवत असतानाच समाजवादी गट शुद्ध अशुद्ध या चक्रव्यूहात अडकून पडला आहे. काँग्रेसची स्थिती आजही केविलवाणी आहे. असे असले तरी या सरकारची घटका भरली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार पुढे आल्याने सत्ताधारी उघडे पडले आहेत. अशा काळात लोकशाही वाचवायची की हुकूमशाही पुढे न्यायची हे ठरवावे लागेल.
विल पावर जागृत करून संघर्ष करण्यासाठी पुढे यावे लागेल. यासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग याची ताकद ओळखली पाहिजे. प्रत्येक गावात संविधान घर निर्माण झाले पाहिजे. ज्यामुळे भारतीय म्हणून सर्व लोक एकत्र येतील. त्याला वैज्ञानिक आधार असेल. हे लवकरच घडेल, अशी माझी आशा आणि धारणा आहे. चळवळीने आजवर बरच काही कमावलं, पण खूप काही गमावलं आहे हे मान्य करून अधिक जोमाने पुढे यावं लागेल. संवेदनशील माणसं निष्क्रिय न राहता क्रियाशील बनाव लागेल. हे नक्की घडेल. मी आशावादी आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले. संसदीय लोकशाही देशात अस्तित्वात आली, हे काही अंशीच खरे आहे. कारण, त्यानंतर विज्ञानाची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करण्याऐवजी जात, धर्म आणि प्रथा-परंपरा, सण-उत्सवात समाज अधिक गुंतून राहिला. प्रगती ऐवजी अधोगतीकडे मार्गक्रमण करू लागला. त्याचे दूरगामी आज दिसत आहेत. यावर देशाने स्वातंत्र्य मिळवले, पण विज्ञानाची वाट हरवून बसला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मागील काही वर्षातील सामाजिक प्रश्न म्हणून जे पुढे आले आहे, त्याची नुसती यादी केली तरी मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते