Baba Adhav passes away : सारथ्य करणाऱ्या ‘अर्जुना’लाही वाटते आज पंढरी पाेरकी झाली..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:44 IST2025-12-10T11:43:59+5:302025-12-10T11:44:20+5:30
माझी पंढरी, माझे विठ्ठल बनून पंचवीस वर्षांपूर्वी आयुष्यात आलेले डाॅ. बाबा आढाव आज मला साेडून गेले अन् मीही पाेरका झालाे. तब्बल दाेन तपं सावली बनून बाबांसोबत राहताना मिळालेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याची किमत दुसऱ्या कशातच करता येणार नाही, हे बाेल आहेत अर्जुन लाेखंडे यांचे.

Baba Adhav passes away : सारथ्य करणाऱ्या ‘अर्जुना’लाही वाटते आज पंढरी पाेरकी झाली..!
पुणे : माझी पंढरी, माझे विठ्ठल बनून पंचवीस वर्षांपूर्वी आयुष्यात आलेले डाॅ. बाबा आढाव आज मला साेडून गेले अन् मीही पाेरका झालाे. तब्बल दाेन तपं सावली बनून बाबांसोबत राहताना मिळालेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याची किमत दुसऱ्या कशातच करता येणार नाही, हे बाेल आहेत अर्जुन लाेखंडे यांचे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीनेदेखील आमची पंढरी आज पाेरकी झाली म्हणत भावनांना वाट करून दिली.
बाबांच्या गाडीचे गेली २५ वर्षे सारथ्य करणारे अर्जुन लाेखंडे हे केवळ चालक म्हणून नाेकरी करत नव्हते, तर सावली बनून ते सतत त्यांच्यासाेबत राहत हाेते. बाबांनी शेवटपर्यंत स्वत: कधीच माेबाइल वापरला नाही. त्यामुळे बाबांशी संवाद साधायचे तर हमाल पंचायतमध्ये की घरी लँडलाइनवर फाेन करावे लागत असे. दुसरा पर्याय हाेता अर्जुन यांच्या माेबाइलवर संपर्क साधण्याचा. अनेकजण दुसराच पर्याय अधिक वापरत हाेते. अर्जुन यांनी कधीच याबाबत तक्रार केली नाही. उलट प्रेमाने संपर्क घडवून देत असत.
मागील काही दिवसांत बाबांची तब्येत कमालीची घसरली आणि अर्जुन यांच्यावरची जबाबदारीदेखील वाढली. तेही अगदी बाबाला अंघोळ घालण्यापासून सर्व कामे केली. बाबादेखील मुलगा माणून काम सांगत. जे काम असिम आणि अंबरने करायला हवं ते तू करत आहेत अर्जुन, असं एकदा बाबा बाेलून दाखविल्याची आठवण सांगताना अर्जुन यांच्या भावनांचा बांध फुटला अन् ते ढसाढसा रडले. थाेडा आधार देत हाेताे तितक्यात त्यांची पत्नी तेथे आली. त्याही बाबांबद्दल भरभरून बाेलू लागल्या. बाबा हीच आमची पंढरी असल्यामुळे पती अर्जुन यांचा जास्तीत जास्त वेळ बाबांसाेबत गेल्याचा त्रागा नाही झाला. कधी फिरायला घेऊन जात नाही, अशी तक्रारही केली नाही. कारण, बाबांचे घर हेच आमच्यासाठी सर्व काही हाेते. आपच्या घरात काही कार्य असले की बाबा आणि माई दाेघेही पूर्णवेळ देत असत. वडीलकीच्या नात्याने सर्व धुरा सांभाळत. त्यामुळे पत्नी, मुलगा, सूनदेखील बाबांच्याच कुटुंबाचा भाग बनली, असे अर्जुन यांनी सांगितले. बाबांच्या जाण्याने पाेरकेपणाची भावना झाली, असेही ते म्हणाले.