Baba Adhav passes away : ...अन् चाफा घेणारे हात आज देण्यासाठी पुढे सरसावले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:03 IST2025-12-10T12:02:17+5:302025-12-10T12:03:45+5:30
- हमाल भवनही बुडाले दु:खात; डाेळ्यांत अश्रू अन् मुखात ‘सत्य की जय हाे, बाबा आढाव अमर रहे’च्या घाेषणा

Baba Adhav passes away : ...अन् चाफा घेणारे हात आज देण्यासाठी पुढे सरसावले..!
-उद्धव धुमाळे
पुणे : भेटायला कुणीही आला की, डाॅ. बाबा आढाव ‘जिंदाबाद’ म्हणून स्वागत करत आणि निराेप घेताना चाफा हातात टेकवत. बाबांची भेट घेतली आणि हातात चाफा पडला नाही तर अनेकांना रुखरुख वाटत असे. चाफा आणि बाबा एक अतूट नातेच तयार झाले हाेते. पण, आज चाफा मिळणार नव्हता. देणारे हात थांबले हाेते आणि देणारे हे हात आपण घेतले पाहिजे, अशी भावना झालेल्या कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनाला आलेल्या सर्वांच्या हातात चाफा फूल टेकवत देणारे हात बनले हाेते.
नेहमीच कष्टकऱ्यांच्या आवाजांनी गजबजणारे मार्केट यार्ड येथील हमाल भवन मंगळवारी (दि. ९) दु:खात बुडाले हाेते... राजकीय नेता असाे किंवा अधिकारी... कामगार असाे की व्यापारी... महिला असाे की चिमुकली... जाे ताे रांगेतून पुढे पुढे येत कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत हाेता. चेहरा पाहताच अश्रूंना बांध फुटत हाेता. कष्टकऱ्यांबराेबरच विविध क्षेत्रांत कार्य करणारे दिग्गज देखील अश्रूंना आवर घालू शकले नाहीत. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचलेले, नैतिक अधिष्ठान असलेले असे नेतृत्व हाेणे नाही. सर्वांचा आधारवड हरपला, अशी भावना व्यक्त करत हाेते.
हमाल भवन येथे सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव आणले गेले. त्यापूर्वीच कष्टकऱ्यांनी गर्दी केली हाेती.
सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचपर्यंत अंत्यदर्शनाची रांग अखंड सुरू हाेती. कष्टकऱ्यांसह राजकारणातील, समाजकारणातील, व्यापारी यांसह विविध क्षेत्रांतील मंडळी अंत्यदर्शन घेत हाेते. आढाव कुटुंबीयांचे सांत्वन करीत हाेते. सायंकाळी चार वाजता मानवंदना देण्यासाठी पाेलिसांचा ताफा हमाल भवनात पाेहाेचला. सलामी दिली. त्यानंतर बराेबर पाच वाजता पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनात ठेवून अंत्ययात्रा वैकुंठकडे मार्गस्थ झाली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. हा संपूर्ण दिवस ‘अमर रहे अमर रहे, बाबा आढाव अमर रहे’, ‘सत्य की जय हाे’च्या घाेषणांनी दणाणून गेला हाेता.
-------------
सत्य की जय हाे...
जिंदाबाद आणि सत्य की जय हाे... या केवळ घाेषणा नव्हत्या, तर डाॅ. बाबा आढाव यांच्या संपूर्ण आयुष्याचा मूलमंत्र हाेते. हे सर्वच चाहत्यांना माहीत हाेते. त्यामुळे कष्टकरी महिलांनी पार्थिवांसमाेरच ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर । जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे’ आणि ‘आजचे अमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव । विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही ।। हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही । दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही’ यांसह समतेची विविध गाणी गात हाेती.
----------
चिमुकल्यांचेही पाणावले डोळे
कष्टकरी महिला ‘बोला क्रांती जिंदाबाद,’ ‘बाबा आढाव अमर रहे’ अशा घोषणा देत हाेत्या. चळवळीची गाणी गात हाेत्या. सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. कष्टकरी, हमाल यांच्याबराेबरच डॉ. बाबा आढाव यांनी आपल्या आयुष्याच्या श्रमातून उभ्या केलेल्या हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयातील विद्यार्थीही आपल्या लाडक्या ‘बाबां’ना अखेरचा निरोप देण्यास आले हाेते. अक्षरांची ओळख करून दिली, स्वप्न पाहण्याचे बळ दिले त्या बाबांना अखेरचा नमस्कार करताना चिमुकल्यांचेही डोळे पाणावले हाेते.