Ayush Komkar : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; बंडू आंदेकर याचा न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:25 IST2025-09-18T21:23:57+5:302025-09-18T21:25:20+5:30
वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, आयुष कोमकर खूनप्रकरण, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Ayush Komkar : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; बंडू आंदेकर याचा न्यायालयात दावा
पुणे : एका पोलिस ठाण्यातील कस्टडीमध्ये मला रात्री दोन वाजेपर्यंत बसवून ठेवले. माझ्याकडे खुनाच्या अनुषंगाने तपास केला. येत्या महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या कुटुंबातून कोण-कोण उभे राहणार आहे? याची माहिती मला विचारली. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, आणि शिवम आंदेकर उभे राहणार असल्याचे मी पोलिसांना सांगितले. त्यानुसार फिर्यादीचा पुरवणी जबाब घेऊन सोनाली आंदेकर हिला अटक करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे, असे बंडू आंदेकर यांनी न्यायालयास सांगितले. तू तपासाची वाट लावली आहे. आता तुझी कशी वाट लावतो बघ ? अशी धमकी मला पोलिसांनी दिल्याचा दावा आंदेकर याने न्यायालयात केला.
दरम्यान, आंदेकर-गायकवाड टोळी युद्धातून घडलेल्या आयुष गणेश कोमकरच्या खूनापुर्वी आरोपी हे वानवडी परिसरात एकत्रित जमले होते. त्यांची बैठक झाली. आरोपी एकमेकांना मोबाईल घरी ठेवून भेटत होते. या आरोपींनी गोळीबाराचा सराव कुठे केला आहे, याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
या प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर (वय ३६) कृष्णा आंदेकरला पिस्तूल पुरविणारा मुनाफ रिजाय पठाण (वय २८, रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर सह १3 आरोपी व मुनाफ आणि सोनाली आंदेकर यांना गुरुवारी (ता. १८) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. दरम्यान, या गुन्ह्यातील पुरुष आरोपींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास मोठा आहे. त्यामुळे सखोल तपास आवश्यक आहे. मकोकानुसार कारवार्इ झाल्याने पोलिस कोठडीचे दिवस देखील वाढले आहेत, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी रुंदावणी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर इतर पुरुष आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.