बाकीची वक्तव्यं करणं टाळा; महिला सुरक्षेकडे लक्ष द्या, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:46 IST2023-06-29T16:57:40+5:302023-06-29T17:46:46+5:30
नवे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे

बाकीची वक्तव्यं करणं टाळा; महिला सुरक्षेकडे लक्ष द्या, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला
पुणे : पुण्यात या महिनाभरात दर्शना पवार हत्या प्रकरण, सदाशिव पेठेतील कोयता हल्ला घटना यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. तसेच राज्यभरातून महिला, तरुणी बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांनी बाकीची वक्तव्य करणं टाळावे आणि महिला सुरक्षेकडे लक्ष दयावे सल्ला पवारांनी दिला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, राज्यभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पुणे तसेच इतर जिल्ह्यातून महिला, तरुणी बेपत्ता होऊ लागल्या आहेत. राज्य सरकार टीकाटिपणी करण्यावर भर देत आहे. सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली, ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता झाल्या आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे. अशा वेळी राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घ्यावा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते फडणवीस
“मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक आमच्या सरकारला नावं ठेवतात. काल-परवा राष्ट्रवादीचे लोक म्हणाले की, आम्ही बेईमानीने सरकार स्थापन केलं. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की, १९७८ साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. ते सरकारमधील ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी बेईमानी केली, असं कुणीही म्हटलं नाही. त्यांनी तेव्हाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यांना कुणीही बेईमान म्हटलं नाही. त्याला पवारसाहेबांची मुत्सद्देगिरी म्हटलं.