Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान; इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:58 IST2025-12-03T09:57:51+5:302025-12-03T09:58:11+5:30
नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण ९ वर्षांनंतर होत असल्याने राज्यकर्त्यांबरोबरच उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान; इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान
पुणे : जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २) झालेल्या निवडणुकीत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सर्वाधिक मतदान इंदापूर नगर परिषदेसाठी ७९.८९ टक्के झाले, तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची या नगर परिषदा वगळता आणि काही नगर परिषदांमधील १० प्रभाग वगळता १२ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले.
मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ‘माॅक पोल’ घेऊन मतदानाला सुरुवात करण्यात आली, तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यानुसार मंगळवारी मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत अर्थात साडेनऊपर्यंत ८.३७ टक्के मतदान झाले. यानंतर साडेअकरापर्यंत ११.८५ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ३५.६८ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील सर्वाधिक मतदान इंदापूर नगर परिषदेसाठी ६०.४१ टक्के, तर मंचर नगरपंचायतीसाठी सर्वाधिक ६१.७५ टक्के मतदान झाले.
साडेतीननंतर मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने संध्याकाळी मतदान केंद्राबाहेर उशिरा रांगा दिसून आल्या. जिल्ह्यातील ५२४ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पायाभूत सुविधा, पाणी, स्वच्छतागृहे, ठरावीक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र, ज्येष्ठ मतदारांसाठी मार्गदर्शक आणि चाकाच्या खुर्च्या, सरकते जिने, पुरेशी सावली, तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही, मतदान यंत्र, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. किरकोळ अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी ७६ आणि सदस्यपदासाठी ९५५, असे एकूण १ हजार ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण ९ वर्षांनंतर होत असल्याने राज्यकर्त्यांबरोबरच उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आणि चिन्ह वाटपानंतर प्रचाराने वेग घेतला होता. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. स्थानिक आघाडी, युतीमुळे निवडणुकीत चुरस आहे.
मतदानासाठी ५२४ मतदान केंद्रांवर चार लाख ५१ हजार २५ मतदारांना शांततेत मतदान करता यावे, सुरळीत प्रक्रिया पार पाडली जावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
मतदानाची टक्केवारी
लोणावळा ७१.३४
दौंड - ५९.३२
तळेगाव ४९.२४
चाकण ७४.२८
सासवड - ६७.०२
जेजुरी - ७८.०६
इंदापूर - ७९.८९
शिरूर : ७१.१४
जुन्नर ६८.३९
आळंदी ७५.६६
भोर ७६.९६
राजगुरूनगर ६८.८७
वडगाव - ७३.३३
माळेगाव - ७७.१९
मंचर - ७४.१९