पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सोमवारी (दि. ९) राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा परवाने कोणत्या निकषांवर द्यावेत, याबाबत सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाचे पुण्यातील विविध रिक्षा संघटनांनी स्वागत केले असून त्यामुळे शहरातील वाढत्या रिक्षांच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने २०१७ मध्ये रिक्षा परवाने खुल्या पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पुण्यात सुमारे ४७ हजार रिक्षा होत्या; मात्र त्यानंतर रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत गेली. सध्या पुण्यात सुमारे १ लाख ४२ हजार रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. वाढत्या रिक्षांमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अनेक रिक्षा संघटनांनी खुला परवाना बंद करण्याची मागणी केली होती. यासाठी वेळोवेळी आंदोलनही करण्यात आले होते. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यांना स्थानिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात सुमारे १४ लाख ऑटो रिक्षा
मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६७ (३) अंतर्गत राज्य सरकारांना प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक रिक्षा परवाने देण्यात आल्याच्या तसेच काही परवाने अवैधरित्या दिल्याच्या तक्रारीही सरकारकडे प्राप्त झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. सध्या राज्यभरात सुमारे १४ लाख ऑटो रिक्षा परवाने दिले आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये रिक्षा परवान्यांचा प्रश्न स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विचार करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो. राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सेवा मिळावी यासाठी रिक्षा परवाना धोरणाबाबत लवकरच आवश्यक निर्णय घेतले जातील. -प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
Web Summary : Maharashtra halts auto-rickshaw permits statewide to address growing traffic. Transport Minister Sarnaik cites concerns over rising numbers, especially in cities like Pune, where permits surged from 47,000 to 142,000 since 2017. The state government will review permit policies, considering local conditions and complaints of irregularities.
Web Summary : महाराष्ट्र में बढ़ते ट्रैफिक को रोकने के लिए ऑटो-रिक्शा परमिट अस्थायी रूप से निलंबित किए गए। परिवहन मंत्री सरनाईक ने बताया कि पुणे जैसे शहरों में परमिट की संख्या 47,000 से बढ़कर 142,000 हो गई है। राज्य सरकार स्थानीय स्थितियों और अनियमितताओं की शिकायतों को देखते हुए परमिट नीतियों की समीक्षा करेगी।