अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:06 IST2025-05-10T14:40:48+5:302025-05-10T15:06:38+5:30

११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू हाेणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल.

August 15th 'deadline' for 11th class admission; Director of Education clarifies | अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट

अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट

पुणे : राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने राबवली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आवडीचे महाविद्यालय घर बसल्या निवडता येणार आहे. यात विद्यार्थ्यांसह पालकांची वेळ आणि पैशांची बचत हाेणार आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू हाेणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली. ऑनलाइन नोंदणीद्वारे प्रक्रिया ट्रॅकिंग हाेणार असल्याने यात पारदर्शकता येइर्ल, असेही ते म्हणाले. यावेळी शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते.

या प्रक्रियेदरम्यान पालकांसह विद्यार्थ्यांची फसवणूक हाेऊ नये म्हणूनही खबरदारी घेतली जात आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ आणि ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

सूर्यवंशी म्हणाले, राज्यात ११ हजार ७३० महाविद्यालय असून, प्रवेश क्षमता १६ लाख ७६ हजार इतकी आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रवेश मिळणार आहे. गतवर्षी सुमारे १२ लाख ५० हजार प्रवेश आले हाेते. पुण्यात सुमारे ६ लाख ५० हजार जागा असून, गतवर्षी साधारणत: साडेचार लाख प्रवेश झाले हाेते. त्यामुळे कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे महाविद्यालयांकडून घेतली जाणारी ब्राऊशर फी, प्रवेशासाठीच्या शिफारसी या प्रकारांना ब्रेक लागेल आणि पालक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्यासाठी लागणाऱ्या वेळ आणि पैशांचीही बचत हाेईल. ही प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संबंधित जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

अनधिकृत महाविद्यालये ‘आऊट‘

महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागणार आहे. यामुळे मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरित्या अकरावी-बारावीला प्रवेश देणाऱ्या संस्थांना आळा बसणार आहे, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

Web Title: August 15th 'deadline' for 11th class admission; Director of Education clarifies