जैन बोर्डिंगच्या प्रकरणात विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:24 IST2025-10-28T10:23:04+5:302025-10-28T10:24:20+5:30
काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही, अनेक लोक निवडणुकी जवळ आल्या की प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात

जैन बोर्डिंगच्या प्रकरणात विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात जैन समाजाच्या भावना समजून घेत त्यांच्या मनाप्रमाणेच होईल, असा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, विनाकारण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव त्यामध्ये घेण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र, पुण्याची जनता सुज्ञ असून, ते सर्व पाहत आहेत, पुण्याच्या जनतेला सर्व समजत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. धंगेकर आणि मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही. अनेक लोक निवडणुकी जवळ आल्या की प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. हा मुद्दा एक बिल्डर्स आणि आमच्या जैन बांधवांमधील आहे. त्यात आम्ही जी भूमिका घ्यायची? ती आम्ही घेतलेली आहे.
आमचा या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय - विशाल गोखले
मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारादरम्यान आम्ही कोणतेही गैरकायदेशीर काम केलेले नाही. तेथे ५० हजार चौरस फुटांचे नवीन वसतिगृह बांधून देणे व तेथील जैन मंदिर आहे तसे जतन करणे, यासाठी आम्ही कटिबद्धता दर्शवली होती; परंतु गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता आम्ही यासंबंधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येथील मंदिर हे आमच्यासाठी देखील पूजनीय आहे व जैन बांधवांच्या या मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळे, सदर मंदिर व वसतिगृहाची इमारत याविषयी जैन धर्मीयांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदर व्यवहार रद्द करण्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र आम्ही सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या ट्रस्टला ई-मेलच्या माध्यमातून पाठवले आहे. - विशाल गोखले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स