अनैतिक संबंधाच्या चौकशीसाठी बोलविलेल्या महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 15:31 IST2020-12-14T15:31:08+5:302020-12-14T15:31:25+5:30
या महिलेने बाथरूममधील आरशाची काच फोडत ती डाव्या हातावर मारुन घेऊन स्वत:ला जखमी करुन घेतले.

अनैतिक संबंधाच्या चौकशीसाठी बोलविलेल्या महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले असताना महिलेने बाथरुममध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात घडली.
याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेवर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पाच जणांनी अमर ओंबासे याच्यावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात भारती विदयापीठ पोलिसांनी तिघा जणांना अटक केली. या प्रकरणात एका ३० वर्षाच्या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी रविवारी दुपारी बोलावले होते. चौकशीदरम्यान या महिलेने लघुशंकेचा बहाणा करुन पोलीस ठाण्यातील महिलांच्या बाथरुममध्ये गेल्या. तेथे त्यांनी आरशाची काच फोडून स्वत:च्या डाव्या हातावर मारुन घेऊन स्वत:ला जखमी करुन घेतले. बराच वेळ झाला तरी ही महिला बाहेर का येत नाही, म्हणून पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याने दरवाजा वाजविला. परंतु, आतून तो बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा जबरदस्तीने उघडला. तर ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.