ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील चौथी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:23 IST2025-12-16T10:22:41+5:302025-12-16T10:23:19+5:30
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला.

ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील चौथी घटना
बेल्हा : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे सोमवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
पारगाव तर्फे आळे येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात बाबू नारायण कापरे आपल्या कुटुंबासह कांदा काढणीसाठी आले होते. कांदा काढत असताना आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित (वय ८, रा. धामणसे, ता. रोहा, जि. रायगड) हा शेताच्या बांधावर बसला होता. याचवेळी परिसरातील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. यावेळी श्रीराम भोर व महिला मजुरांनी उसाच्या शेतात शिरून रोहितला पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु, या हल्ल्यात रोहित बाबू कापरे हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
रोहित बाबू कापरे याचा झालेला मृत्यू हा पारगावच्या हद्दीत असला तरी, पिंपरखेडजवळील या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरली आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन आणि मानवी वस्तीवरील हल्ले वाढत असल्याने वन विभाग आणि स्थानिक प्रशासनावर नागरिकांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची आणि परिसरात पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.दरम्यान , घटनास्थळी आमदार शरद सोनवणे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार , शिवसेना ( उद्धव ठाकरे ) तालुका प्रमुख माऊली खंडागळे , सुरज वाजगे यांनी भेट दिली. आमदार शरद सोनवणे यांनी या घटनेने वनाधिकारी यांना फैलावर धरले.
बिबट्याची वाढती चिंताजनक संख्या आणि या सर्व बिबट्यांना ठेवायचे कुठे, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे येथील सर्व बिबट त्वरित पकडावेत, त्यांचा बंदोबस्त करावा, मानवी वस्तीकडे येऊ देऊ नका, जनतेला मोकळा श्वास घेऊ द्या. - शरद सोनवणे, आमदार
मृत्यू झालेल्या मुलास तातडीची आर्थिक मदत तसेच त्याच्या गावी नेण्यासाठी अंत्यविधीसाठी गाड्या तसेच अंत्यविधीचा सर्व खर्च वनविभाग करणार आहे तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पिंजऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करून आठ दिवसांत सर्व बिबटे पकडले जातील. - प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक जुन्नर
कुरण येथील वनक्षेत्रातील ८८ हेक्टर पैकी ४८ हेक्टर मध्ये बिबटे ठेवण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. -स्मिता राजहंस, सहाय्यक वन संरक्षक, जुन्नर