गर्लफ्रेंडसमोर पगार विचारल्याने तरुणाला लोखंडी पाईपाने धुतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:34 IST2020-01-13T14:32:02+5:302020-01-13T14:34:59+5:30
बाईचे वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारु नये, अशी आपल्याकडे म्हण आहे़...

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारल्याने तरुणाला लोखंडी पाईपाने धुतला
पुणे : बाईचे वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारु नये, अशी आपल्याकडे म्हण आहे. पण आताच्या तरुणांना या म्हणी फारशा माहिती नसतात. त्यामुळे काय होऊ शकते, याची प्रचिती एका तरुणाला आली. त्याने चक्क गर्ल फ्रेंडसमोरच पगार विचारला. त्याचा परिणाम या मित्राने आपल्या बाऊंसर भावासह तिघांना बोलावून लोखंडी पाईपाने मारहाण करीत धुतला़ ही घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकाततील चायनीज शॉपसमोर ११ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित मोरे (रा़ करण सोसायटी, वडगाव), रॉनी अर्कस्वामी, अँथोनी अर्कस्वामी (दोघे रा़ नामदेवनगर, वडगाव शेरी) आणि नानु (रा़ ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अँथोनी अर्क स्वामी आणि हा तरुण एकमेकांचे मित्र आहेत. ५ जानेवारी रोजी अँथोनी हा आपल्या गर्ल फ्रेंडबरोबर हॉटेल सनसिटी येथे बसला होता. त्यावेळी हा तरुण तेथे गेला व त्याने बोलण्याच्या नादात गर्लफ्रेंडसमोर अँथोनी याला त्याचा पगार विचारला. अँथोनी हा ईशार्न मॉलमध्ये काम करतो. गर्लफ्रेंडसमोर मुद्दाम पगार विचारुन आपला अपमान केला, असा समज करुन घेतला. त्याचा भाऊ रॉनी हा बाऊंसर म्हणून काम करतो. रॉनी व इतर दोघांना घेऊन शनिवारी रात्री साडेऊ वाजता ते शास्त्रीनगर चौकात आले होते. त्याने या तरुणाला तेथे बोलावून घेतले व गर्ल फ्रेंडसमोर पगार का विचारला असे म्हणून त्यांनी लोखंडी पाईपाने त्याच्या पाठीवर, हातावर, पायावर मारहाण करुन त्याला जबर जखमी केले. येरवडा पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.