कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:42 IST2025-06-26T19:40:58+5:302025-06-26T19:42:20+5:30

वारकरी भाविकांसह अवघी बारामती 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठुनामाच्या जयघोषात भक्तिरसाने चिंब झाल्याचे चित्र होते.

Ashadhi Wari The palanquin ceremony of Tukoba was held in Baramati, the birthplace of poet Moropant; the entire city of Baramati was in a state of shock in the name of Vitthal | कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग

कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग

बारामती - संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी(दि २ ६) बारामती शहरातील शारदा प्रांगणात विसावला. यावेळी वरुणराजाबरोबरच टाळ-मृदंगाचा गजर, गुलाबपाण्याचा शिडकाव्याचा सुगंध आणि ज्ञानबा तुकाराम विठोबाच्या जयघोषाने अवघा आसमंत भारावला. वारकरी भाविकांसह अवघी बारामती 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठुनामाच्या जयघोषात  भक्तिरसाने चिंब झाल्याचे चित्र होते. संपूर्ण बारामती वारीमय झालेली पाहावयास मिळाली. वेशीवर बारामतीतील पाटस रस्त्यावरील देशमुख चौकात पालिकेकडून भव्य व्यासपीठ पालखी स्वागतासाठी उभारण्यात आले होते.

सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने   प्रत्येक चौकात केलेल्या फुलांच्या सजावटीद्वारे बारामती नगरी नववधुप्रमाणे सजली होती. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,मुख्याधिकारी पंकज भुसे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पोलिस निरीक्षक , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

पालखी सोहळ्याच्या आगमनापुर्वी झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यांचा सोहळ्यातील शिस्तबद्ध सहभागाने बारामतीकरांचे लक्ष वेधले. सायंकाळी सातच्या सुमारास शारदा प्रांगणातील भव्य शामियानात सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. पालखी सोहळा शनिवारी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील प्रस्थान ठेवणार आहे.तत्पुर्वी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या अंथरुन पालखी सोहळा स्वागत होणार आहे.दुपारी विसाव्यानंतर पालखी रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ठ्यपुर्ण रींगणसोहळा पार पडणार आहे. 

नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 'हरित वारी-सुरक्षित वारी' च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात  आला. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. 

Web Title: Ashadhi Wari The palanquin ceremony of Tukoba was held in Baramati, the birthplace of poet Moropant; the entire city of Baramati was in a state of shock in the name of Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.