Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:44 IST2025-06-24T17:43:42+5:302025-06-24T17:44:23+5:30

जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले.

ashadhi wari Mauli welcomed with a grand feast in Jejuri; Mauli devotees had darshan of the ancestral deity | Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

- बी.एम. काळे

जेजुरी -
 ‘जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा..पोटा येतां हरले पापा, ज्ञानदेवा मायबापा.. या तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव आज कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीत सायंकाळी ५.३० वाजता पोहोचले. जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले.



आज सकाळी श्री संत सोपानकाकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजूरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण ढगांनी आछादलेले आभाळ,आल्हाददायक वातावरण आणि पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अंगावर पर्जन्यवृष्टी घेत दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सुर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झप झप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवके मळा येथील न्याहारी उरकून शिवरी येथे दुपारच्या विश्रांती साठी निघाला. यावेळी वरुणराजाने विश्रांती घेतली होती. पुढे,  शिवरी येथील दुपारची विश्रांती त्याच बरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी पाच वाजता मजल दर मजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.

जेजुरीत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडार्‍याची मुक्त हस्ताने उधळण करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत करण्यात येत होते. मार्तंड देवसंस्थान च्यावतीने ही प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अड विश्वास पाणसे, अनिल सौन्दडे, पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर  यांनी भंडार्‍याच्या उधळणीत माऊलीचे स्वागत केले.  दररोज अबीरबुक्यात न्हाऊन निघणारा सोहळा जेजूरीत पिवळ्या जर्द भंडार्‍यात न्हाऊन निघाला

Web Title: ashadhi wari Mauli welcomed with a grand feast in Jejuri; Mauli devotees had darshan of the ancestral deity