परस्परांना आवडणारी दोन्ही माझी आवडती माणसं दोन महिन्यांच्या फरकाने जावीत, हा दुर्दैवविलास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:30 IST2026-04-12T18:24:42+5:302026-04-12T18:30:57+5:30
बारामती : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुन्हा एकदा मन हळहळले. आता समोर येणारी प्रत्येक गोष्ट ...

परस्परांना आवडणारी दोन्ही माझी आवडती माणसं दोन महिन्यांच्या फरकाने जावीत, हा दुर्दैवविलास
बारामती : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुन्हा एकदा मन हळहळले. आता समोर येणारी प्रत्येक गोष्ट ही अजितदादा यांच्या आठवणींशी जोडली जाते. इतके माझे आयुष्य अजितदादामय झाले होते, हे अशा प्रत्येक घटनेतून जाणवते. आशाताईंच्या निधनाच्या बातमीनेही तेच घडले, अशा शब्दांत अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सिनेनिर्माते महेश टिळेकर त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना सोबत घेऊन ‘मराठी तारका’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करीत असत. त्या चमूत मुसळे यांचा मुलगा संग्राम हाही सहभागी होता. तो कार्यक्रमाची फोटोग्राफी करायचा. १ मार्च २०१४ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगेशकर कुटुंबीयांशी संग्रामची चांगली ओळख असल्यामुळे टिळेकर यांनी त्यालाच आशाताईंना आणण्याची जबाबदारी दिली. त्याने आशा भोसले आणि अभिनेत्री रेखा यांना कार्यक्रमस्थळी आणले. या कार्यक्रमाला आशाताई आणि रेखा यांच्यासह अजितदादा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अजितदादांना त्यांच्या आवडत्या गायक, गायिका, अभिनेता आणि अभिनेत्रींबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी किशोर कुमार, आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि रेखा अशी नावे घेतली. या उत्तराने आशाताई आणि रेखा दोघीही आनंदित झाल्या. आशा भोसले आणि अजितदादा यांचे खूप जुने व स्नेहपूर्ण संबंध होते. या स्नेहातून आशाताईंनी अजितदादांना रेखासोबत स्टेजवर नृत्य करण्याची विनंती केली. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या फटाकडी चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्याचा आग्रह त्यांनी धरला. हे गाणे आशा भोसले यांनी गायले असून चित्रपटात ते रेखावर चित्रित झाले आहे. त्यामुळे सभागृहात एकच जल्लोष झाला.
मात्र, अजितदादा आपल्या स्वभावाप्रमाणे हा आग्रह नम्रपणे टाळला. रेखा यांनीही “अजितजी, चलो करते हैं डान्स,” असे म्हणत विनंती केली, तरीही त्यांनी नृत्य करण्यास नकार दिला. त्यानंतर कार्यक्रम पुढे सुरू राहिला. कार्यक्रमानंतर तसेच पुढील काही प्रसंगी आशाताईंनी अजितदादांना बारामतीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. “तुम्ही तिथे खूप चांगले काम केले आहे,” असे त्या म्हणत. त्यावर अजितदादा, “केव्हाही या, तुमचे स्वागत आहे,” असे उत्तर देत असत. अशा या स्नेहपूर्ण नात्यात जोडलेली ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे माझ्या मनाला अत्यंत प्रिय होती. दोन महिन्यांच्या फरकाने या दोघांचीही एक्झिट व्हावी, हा खरोखरच दुर्दैवविलास आहे, असे मुसळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.