भाजपाची ताकद वाढल्याने पक्षावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरु; सूज्ञ पुणेकरांना हे सहज समजेल - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:55 IST2025-10-31T11:54:43+5:302025-10-31T11:55:35+5:30
जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले गेले, निवडणूक जवळ आली या प्रयत्नांना जोर येतो

भाजपाची ताकद वाढल्याने पक्षावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरु; सूज्ञ पुणेकरांना हे सहज समजेल - चंद्रकांत पाटील
पुणे : शहरातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या हॉस्टेलसंदर्भातील व्यवहार रद्द करण्याचा आदेश राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी (दि. ३०) दिला. ‘हा मुद्दा जैन समाज आणि संबंधित विकासक यांच्यातील असून, जैन समाजाच्या भावनांना न्याय दिला जाईल,’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी सामाजिक सलोखा जपणारी भूमिका घेत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि विकासक यांच्या परस्पर मान्यतेने व्यवहार पूर्णतः रद्द करण्याचा आदेश दिला आहे. याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या व्यवहारापोटी ट्रस्टला अदा केलेली रक्कम विकासकाला परत देण्याचे स्पष्ट निर्देशही धर्मादाय आयुक्तांनी दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
या विषयात पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले गेले. भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेकांच्या असुयेचा विषय आहे. त्यातूनच पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. निवडणूक जवळ आली की, या प्रयत्नांना जोर येतो. मोहोळ यांच्या बदनामीचा प्रयत्न हा या असुयेचाच भाग होता. या प्रकरणात आरोपांची राळ उठवणाऱ्यांच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना सहज समजू शकेल. या प्रकरणात विविध आरोप व टीका होत असतानाही जैन समाजासाठी अत्यंत शांत, संयमी आणि संतुलित भूमिका घेतलेल्या मोहोळ यांचे विशेष अभिनंदन करतो. या निर्णयामुळे जैन समाजाच्या मागणीला योग्य तो न्याय मिळाला असून, जैन मुनींचाही सन्मानपूर्वक आदर केला गेला आहे. याविषयी जैन समाजाने घेतलेल्या सामजंस्य भूमिकेबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.’’
भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळणारा जनतेचा कौल हा प्रत्येक समाजघटकाचा विश्वास कमावण्यातून मिळालेला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी पक्ष, नेते आणि कार्यकर्ते सातत्याने घेत असतात. हा विश्वास पुन्हा एकदा देवेंद्रजींनी सार्थ ठरवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात विनाकारण सुरू असलेली चिखलफेक थांबवावी आणि पुण्यातले वातावरण आणखी गढूळ करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.