Pune Crime: ससूनमध्ये उपचारासाठी आलेल्यांवर शस्त्राने हल्ला; २ गटात तुफान हाणामारी, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:47 IST2026-02-06T19:46:11+5:302026-02-06T19:47:12+5:30
पोलिसांना फोन का केला? म्हणून मारहाण केल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आरोपींनी पुन्हा शस्त्राने हल्ला केला

Pune Crime: ससूनमध्ये उपचारासाठी आलेल्यांवर शस्त्राने हल्ला; २ गटात तुफान हाणामारी, तिघांना अटक
पुणे : कौसरबाग परिसरात दोन गटांतील भांडणाची ठिणगी पेटल्यानंतर हा वाद थेट ससून रूग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोंढवा येथील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झालेल्या चौघांवर शस्त्राने वार करण्यात आला. या घटनेत दोन्ही गटांतील चार जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटांतील एकूण १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अस्लम हनीफ खान (४२, रा. कुबेरा गार्डन, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या घटनेत अस्लम खान, त्यांचा भाऊ सलीम खान आणि पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी रात्री अस्लम खान हे कौसरबाग परिसरात गेले असता काही जणांमध्ये शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू होती. ही बाब त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर आरोपी शफाक अशफाक शेख व त्याच्या साथीदारांनी पोलिसांना फोन का केला, असा जाब विचारत अस्लम खान यांच्याशी वाद घातला. पुढील दिवशी ४ फेब्रुवारी रोजी रात्री कोंढवा परिसरात पुन्हा आरोपींनी अस्लम खान यांना अडवून लोखंडी फायटरने मारहाण केली.
जखमी अवस्थेत अस्लम खान यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ सलीम, पुतण्या अब्दुल समद तसेच काही मित्र आले. मात्र, ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आरोपींनी पुन्हा शस्त्राने हल्ला केला. अस्लम व सलीम खान यांच्यावर वार करण्यात आले, तर सलीम यांना वाचवण्यास गेलेल्या अब्दुल समदच्या मांडीवर शस्त्राने वार करण्यात आला.
या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शफाक अशफाक शेख (२९, रा. भवानी पेठ) व शहबाज झाकीर खान (३१, रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी शफाक शेख यानेही परस्परविरोधी फिर्याद दिली असून मोहम्मद जिब्रान जुनेद सय्यद (३०, रा. कौसरबाग, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे पुढील तपास करत आहेत.