Pune Crime: गुन्हेगार आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा धाक आहे की नाही? पुण्याला गुन्हेगारीचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:31 IST2025-09-22T17:31:07+5:302025-09-22T17:31:33+5:30

पुणे शहरात, पेठेत दिवसाढवळ्या खून होतो, कोथरूडमध्ये फायरिंग केले जाते, उपनगरांमध्ये अपहरणाचे प्रकार घडतात, सरकारी रुग्णालयातून अमलीपदार्थांची तस्करी तर खुलेआम चालते

Are criminals and police afraid of the rulers? Pune is plagued by crime | Pune Crime: गुन्हेगार आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा धाक आहे की नाही? पुण्याला गुन्हेगारीचा विळखा

Pune Crime: गुन्हेगार आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा धाक आहे की नाही? पुण्याला गुन्हेगारीचा विळखा

पुणे: उपमुख्यमंत्री असलेले पालकमंत्री, केंद्रीय मंत्रीमंडळातील राज्यमंत्री, राज्यातील मंत्री मंडळात १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री, त्याशिवाय मुख्यमंत्ऱ्यांचा महिन्यातून चार वेळा शहराचा दौरा! असा सगळा ‘बायोडेटा’ असलेल्या पुणे शहरात, पेठेत दिवसाढवळ्या खून होतो, कोथरूडमध्ये फायरिंग केले जाते, उपनगरांमध्ये अपहरणाचे प्रकार घडतात, सरकारी रुग्णालयातून अमलीपदार्थांची तस्करी तर खुलेआम चालते, दारू पिऊन बड्या धेंडांची मुले रात्रीतून एखाद्या गरिबाला ठोकून पळून जातात असे घडत असेल यावर कोण विश्वास ठेवेल? पण हे घडते आहे व त्यामुळेच सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगार व पोलिसांवर काही वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न पुणेकरांकडून जाहीरपणे विचारला जात आहे. आम्हाला कोणी वाली आहे की नाही? असा त्यांचा प्रश्न आहे.

शांत, निवांत इतकेच नव्हे तर पेन्शनरांचे शहर असा पुण्याचा लौकिकच या गुन्हेगारीने इतिहासजमा केला आहे. नामचिन गुन्हेगारांच्या दिवसाढवळ्या मिरवणूका निघतात. रात्री १२ वाजले की त्यांच्या वाढदिवसाचे बार सोसायट्यांमधल्या रस्त्यांवर फुटतात. यावरून गुन्हेगार आणि पोलिस हातात हात घालून चालतात की काय? अशी शंका यावी असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. वर जंत्री दिली आहे ते सगळे जबाबदार पदाधिकारी शहरात असताना या सर्व गोष्टी होतात याची पुणेकरांना आता धडकी बसली आहे. मुंबईत म्हणे घरातून सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही अशी भीती असते. तिथे ती निदान दहशतवादी घटनांमुळे अनाठायी आहे असे म्हणता येत नाही. पुण्यात मात्र सकाळी घराबाहेर गेलेला माणूस भांडणात सापडेल का?, गाडीची धडक बसली म्हणून कोणी त्याला मारहाण करेल का? अशी भीती जोर धरत आहे.

सरकारमध्ये काम करणारा मंत्री म्हणजे केवढा मोठा माणूस! उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार भऱ बैठकीत सरकारी अधिकाऱ्याला झापतात, मग स्वपक्षाचे काम करणाऱ्या गुन्हेगार व्यक्तीसमोर का शांत होतात? केंद्रीय राज्यमंत्री म्हणजे केवढा रूबाब!, राज्य सरकारात कॅबिनेट मंत्री म्हणजे केवढा रूतबा! पण ही पदे असणाऱ्या मुरलीधऱ मोहोळ व चंद्रकांत पाटील रहिवासी असलेल्या कोथरूडातच गोळीबार होतो, एखाद्या गुंडाचे पंटर कोणाला तरी पुलाखाली जबर मारहाण करतात, काहीजण भर रस्त्यात गोळीबार करतात असे होते तरी कसे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या जवळपास वर्षभरात सातत्याने पुणे शहराचा दौरा करतात. महिन्यात किमान चार वेळा व कधीकधी तर एका आठवड्यात दोन वेळा असा त्यांचा वेग आहे. ते गृहमंत्री आहेत. पुण्यावर माझे प्रेम आहे असे जाहीरपणे सांगतात. मग तरीही त्यांचा पोलिसांवर व पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक का निर्माण होत नाही?

एकदा नव्हे, दोन वेळा, तीन वेळा व आता तर कधीही काहीही घडेल असे धास्ती कोथरूडकरांमध्ये निर्माण झाली आहे याची माहिती तरी या महनीय व्यक्तींना आहे की नाही? ‘ गुन्हेगारांचा आमच्याशी, आमच्या पक्षाशी काहीही संबध नाही’ असा खुलासा केल्याने पुणेकर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल असे त्यांना वाटते का? सध्या तरी हा विश्वास नाही हे वास्तव आहे. तो निर्माण करण्याची, घाबरलेल्या सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा देण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच आहे. ते ती पार पाडणार की नाही? याकडे पुणेकरांचे लक्ष आहे. गुन्हे घडतात, पोलिस कारवाई करतात, गुन्हेगारांना तुरूंगात डांबतात हे खरे असले तरी गुन्हेगारी घटनांमध्ये जे सातत्य पुणे शहरात निर्माण झाले आहे ते थांबणार की नाही? हा पुणेकरांचा प्रश्न आहे.

या आहेत पुणे शहरातील धडकी भरवणाऱ्या गुन्हेगारी घटना

१) १ ऑक्टोबर २०२३ मध्ये ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवणारा ललित पाटील प्रकरणाचा भांडाफोड.
२) ५ जानेवारी २०२४ रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून.
३) १९ मे २०२४ रोजी पोर्शे कार अपघातात एका युवकासह युवतीचा मृत्यू.
४) १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून.
५) २१ फेब्रुवारी २०२५ रोजी गजा मारणे टोळीतील सदस्यांनी एका तरुणाला जबरी मारहाण केली.
६) ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकरवर बंडू आंदेकर टोळीने गोळीबार करत खून.
७) १८ सप्टेंबर २०२५ रोजी गुंड नीलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी एकावर गोळीबार.

Web Title: Are criminals and police afraid of the rulers? Pune is plagued by crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.