पवनानगर : लोहगड किल्ल्याला जागतिक वारसास्थळाचे स्थान मिळाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. किल्ल्यावर शनिवारी मोठ्या संख्येने शिवप्रेमी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ एकत्र जमले. फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १३ गडकिल्ल्यांचा समावेश केल्याचे शुक्रवारी जाहीर केले. त्यात मावळ तालुक्यातील लोहगडाचाही समावेश आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि गड-किल्लेप्रेमींचा आनंद दुणावला. शनिवारी पायथ्याशी शिवप्रेमी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ एकत्र जमले. पायथ्यावरील शिवस्मारकावरील शिवमूर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
फटाक्यांच्या आतषबाजीत, वाजंत्रीच्या गजरात, सर्व शिवप्रेमी व अधिकाऱ्यांनी मिरवणूक काढली. पायथा परिसरात साखर, लाडू वाटप झाले. या मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व विभाग यांचे अभिनंदन करण्यात आले. गेली पंचवीस वर्षे लोहगड-विसापूर विकास मंच लोहगड संवर्धनाचे काम करीत आहे. त्यामुळे मंचाच्या कार्यकर्त्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता.
कार्यक्रमाला मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, पुरातत्त्व विभागाचे सचिव विलास वाहने, पुरातत्त्व अधिकारी गजानन मुंडावरे, बजरंग येलेकर, सचिन टेकवडे, संदीप गाडे, विश्वास दौंडकर, सरपंच सोनाली बैकर, अलका धानिवले, गणेश धानिवले, श्रमिक गोजममुंडे, ग्रामस्थ, मंचाचे कार्यकर्ते, बजरंग दल कार्यकर्ते, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.