पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 07:59 PM2018-10-09T19:59:28+5:302018-10-09T20:11:00+5:30

पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे.

Approval 29,000 houses of PMRDA: Prakash Mehta | पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता

पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेसाठी स्वतंत्र पोर्टलचे मुंबईत उद्घाटनपीएमआरडीए गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित

पुणे : राज्याला सध्या १९ लाख ४०० घरांची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत येत्या दोन वर्षात २.३५ लाख घरे उपलब्ध होतील. पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. याकरिताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गरजूंसाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे, असे मत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले. 
पीएमआरडीएच्या प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेला गतिमानता व पारदर्शकता प्राप्त करून देण्याकरिता नागरिकांसाठी ‘माहिती व्यवस्थापन प्रणाली’ (पोर्टल) विकसित केली आहे. मुंबई येथे आयोजित ‘परवडणार घरं परिषद महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवारी प्रकाश मेहता यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन केले.    
एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, संयुक्त सचिव अमरीत अभिजात, आवास व शहरी कार्य मंत्रालय अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, मध्यप्रदेश रेराचे अध्यक्ष अनथोनी दे. सा., पीएमआरडीएचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे उपस्थित होते. 
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मितीसाठी पीएमआरडीए, मार्फत १४ प्रस्ताव केंद्रीय देखभाल व परवानगी समितीने मंजुरी दिली आहे. मोक्याच्या ठिकाणी २९ हजार ७० परवडणारी घरे निर्माण होणार आहेत. या २९ हजार ७० घरांसाठी अर्ज स्वीकारण्यापासून तर घर हस्तांतरण करण्याची सर्व प्रक्रिया या प्रणालीमधून होईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. 
..................................
या प्रणालीमधून अर्जदाराला स्वत:च्या अर्जाची स्थिती व इतर सर्व बाबींची माहिती पाहण्यासाठी उपयोगी होईल. अर्ज करण्यासाठी तसेच अर्जावरील प्रक्रिया करण्यासाठी पीएमआरडीए अर्जदारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. आर्थिक पिळवणुकीला आळा घालण्यात मदत होईल.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए
.............................
अर्ज करण्याची पद्धत
१) सर्वप्रथम www.pmrdapmay.com संकेतस्थळावरून अर्ज व इतर नमुने डाऊनलोड करून घ्यावे.
२) अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र हे १०० रूपयांच्या मुद्रांकावर असणे अपेक्षित आहे. १०० चा मुद्रांक उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर सुद्धा चालेल व त्यासाठी लागणारा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभ मिळतेवेळी १०० रूपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असेल.
३) अर्ज यशस्वीरित्या प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएसद्वारे आॅनलाईन अर्ज क्रमांक पाठवला जाईल आणि सोबतच अर्जाची पोचपावती मिळणार आहे. 
..................................
घरकुलांसाठी आवश्यक पात्रता   
१) प्रत्येक कुटुंब उत्पन्न गटानुसार अर्ज करू शकतात. कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अवलंबित मुले-मुली (अविवाहित).
२) कुटुंबाच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. परंतु स्वावलंबी मुले-मुली (अविवाहित) अर्ज करू शकतात.
३) कुटुंबाने किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने या अगोदर कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
४) घरकुल बांधकामासाठी शासकीय खरेदी अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वत: करावी लागेल.
५) अर्जदाराच्या नावाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे व अर्ज सादर करताना बँकेचे आयएफसी कोड असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

Web Title: Approval 29,000 houses of PMRDA: Prakash Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.