पुणेकरांची चिंता मिटली ; फळे, भाजीपाल्याची आवक होण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 10:15 IST2020-03-28T09:58:20+5:302020-03-28T10:15:36+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असलेल्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार सुरु झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांची चिंता मिटली ; फळे, भाजीपाल्याची आवक होण्यास सुरुवात
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असलेल्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार सुरु झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध होणार आहे. शनिवारी सुमारे ६०० गाड्यांची अवाक झाली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. मात्र खरेदीसाठी सामान्य नागरिकांनी नाही तर फक्त ठोक विक्रेत्यांनी यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे, देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती जरी आज साप्ताहिक सुट्टीमुळे बंद आहे. पण शहरानजीक असणारे मांजरी, मोशी, उत्तमनगर नि खडकी उपबाजार आवार आज सुरु आहे. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांनी माल आणला असून ठोक विक्रेत्यांकडून तो शहरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत होणार आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बाजार समिती प्रशासन सर्व खबरदारी घेत असून 'सोशल डिस्टन्स' ठेवला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, 'ठोक व्यापारी माल घेऊन सर्व भागातील विक्रेत्यांना देतील. मात्र बाजार समितीत थेट नागरिकांनी गर्दी करू नये. घराजवळ सर्व माल उपलब्ध होईल. आणि यापुढे बाजार समितीही सुरु असणार असल्याचीही माहिती देण्यात आली.